मोहाडी तालुक्यात ६४ शेततळ्यांचे काम पूर्ण

By admin | Published: January 18, 2017 12:25 AM2017-01-18T00:25:29+5:302017-01-18T00:25:29+5:30

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत सन २०१५-१६-१७ या वर्षात शेतकऱ्यांचे जवळपास २५० अर्ज प्राप्त झाले. शेततळे शेतकऱ्यांनाच पूर्ण करावयाचे आहे.

Completed the work of 64 farmers in Mohadi taluka | मोहाडी तालुक्यात ६४ शेततळ्यांचे काम पूर्ण

मोहाडी तालुक्यात ६४ शेततळ्यांचे काम पूर्ण

Next

करडी परिसरात सर्वाधिक ४५ : मागेल त्याला शेततळे योजना
करडी (पालोरा) : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत सन २०१५-१६-१७ या वर्षात शेतकऱ्यांचे जवळपास २५० अर्ज प्राप्त झाले. शेततळे शेतकऱ्यांनाच पूर्ण करावयाचे आहे. तालुक्यात मागील वर्षी सुमारे १९ तर यावर्षी ४५ असे एकूण ६५ शेततळ्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहेत. यावर्षी ५० टक्के आणेवारीची अट शिथील करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मागेल त्याला शेततळे योजना शासनाच्या वतीने सन २०१५-१६ वर्षात सुरु करण्यात आली. मोहाडी तालुक्यात योजनेचा चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे ३०० शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करून शेततळ्यांची मागणी नोंदविली होती. परंतु आॅनलाईन अर्जात त्रृट्या आढळून आल्या तसेच शासनाच्या निकषानुसार ५ वर्षात संबंधित गावाची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी असण्याची अट असल्याने सुमारे १०० च्या वर अर्ज लाभापासून वंचित ठरले होते.
मागील वर्षी शासनाच्या निर्देशानुसार कामांना प्रारंभ करण्यात आला. सुमारे १९ शेततळे शेतकऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने पूर्ण केले. सन २०१६-१७ मध्ये शासनाने ५० टक्के आणेवारीची अट रद्द करण्यात आली. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मागील वर्षात आॅनलाईन अर्ज केलेल्यांपैकी सुमारे ५० शेतकऱ्यांनी पुन्हा शेततळ्यांसाठी अर्ज केले. आॅनलाईन आलेल्या अर्जानुसार जवळपास २५० शेततळ्यांची मागणी अपेक्षित धरण्यात आली आहे.
सुमारे २५० अर्जापैकी ६४ शेततळे पूर्ण करण्यात आले. त्यातील ४५ शेततळे करडी परिसरातील आहेत. बरेचशी कामे पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहेत. करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. तसेच एका पाण्याने शेती नुकसानग्रस्त ठरण्याचे प्रमाणही अधिक असल्याने या भागातून सर्वाधिक मागणी करण्यात आली. कामे पूर्ण होण्याचे प्रमाणही त्यामुळे करडी परिसरात सर्वाधिक आहेत.
करडी परिसरातील कामांपैकी सुमारे २२ शेततळे पालोरा परिसरातील आहेत. कामे पूर्ण होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी किशोर पाथ्रीकर, मंडळ अधिकारी राहुल गायकवाड, करडीचे पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, कृषी सहाय्यक यादोराव बारपात्रे, उदाराम निखारे, देवेंद्र वाडीभस्मे यांची मदत मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मोहाडी तालुक्याच्या वैनगंगा पलीकडील भागात पेंच व बावनथडीचे पाणी पोहचत असल्याने शेतकरी वर्गाने पाहिजे तेवढा प्रतिसाद दिला नसल्याचे अधिकारी स्तरावरून सांगण्यात आले. (वार्ताहर)

सिंचन विहिरींसाठी ५२४ अर्ज प्राप्त
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा कार्यालयाला मागेल त्याला सिंचन विहिर योजनेसाठी सुमारे ५२४ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये भंडारा तालुका १९०, तुमसर १७८, मोहाडी १५६ अर्जांचा समावेश आहे. सर्व अर्ज आॅनलाईन केलेले आहेत. सिंचन विहिरीच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून कामे सुरु करण्यासाठी ले आऊट देण्याचे काम तातडीने केले जात आहेत. जिल्ह्याला सुमारे १००० सिंचन विहिरींचा लक्षांक देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता आर.एच.गुप्ता यांनी दिली.

करडी परिसरातील शेतकऱ्यांनी शेततळ्यांना चांगला प्रतिसाद दिला. मशीनच्या सहाय्याने आतापर्यंत करडी परिसरात ४५ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले. कामांची पाहणी व तांत्रिक सहाय्यक कृषी विभागाने दिले. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जात आहे.
- निमचंद्र चांदेवार, कृषी पर्यवेक्षक, करडी
कोरडवाहू करडी क्षेत्रात सर्वाधिक कामे झाली.मोहाडीच्या उर्वरित भागात ओलीताची सोय असल्याने शेतकऱ्यांना वारंवार विनवणी करूनही प्रतिसाद लाभला नाही. जेवढ्या लोकांनी मागणी केली त्यांना लाभ मिळणार आहे. ५० टक्के आणेवारीची अट आता रद्द करण्यात आली आहे.
- किशोर पाथ्रीकर, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी

Web Title: Completed the work of 64 farmers in Mohadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.