एनआरसीच्या विरोधात बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:47+5:30
भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातून एक मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंडई पेठेतून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सीएए, एनआरसीच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला भंडारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तुमसर आणि अड्याळ येथे मोर्चा काढून बंद पाळण्यात आला तर भंडारा शहरातही काही भागात व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातून एक मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंडई पेठेतून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी नंदलाल मेश्राम, डॉ.हर्षवर्धन कोहपरे आदींनी मार्गदर्शन केले. अड्याळमधील व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.
तुमसर येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. रविदास लोखंडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला हा मोर्चा शहरातील विविध भागातून गेला. या मोर्चात दुर्गाप्रसाद परतेती, नगरसेवक सलाम तुरक, लक्ष्मीकांत सलामे, कमल रजा रजवी, तिलक गजभिये, सिद्धार्थ मेश्राम, मोहीत मेश्राम यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाला प्रारंभ नगरपरिषदेजवळील नेहरु विद्यालयाजवळून होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी तुमसर शहर दणाणून गेले होते. जिल्ह्यात बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.