महाराष्ट्र सरकारबाबत भंडारा जिल्ह्यात उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 05:21 PM2019-11-23T17:21:36+5:302019-11-23T17:22:07+5:30
भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात विकासाच्या अनेक योजना सुरु आहेत. अशा सर्व योजना सुरु राहण्याकरिता महाराष्ट्रात पुन: भाजप सरकार स्थापित होणे आवश्यक होते. तसेच जनतेचा कल देखील भाजप शासन करीतच आहे. भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस - आमदार नाना पटोले
सरकार स्थापनेची आजची प्रक्रिया घटना विरोधी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय लौकिकाला हा कलंक असून राज्याच्या राजकीय इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक कधी झाली. राष्ट्रपतींकडे केव्हा शिफारस केली आणि राष्ट्रपती राजवट कधी संपली हे अनाकलनीय आहे. आता विश्वासदर्शक ठराव भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावा, असे साकोलीचे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सांगितले.
लोकांच्या मनातील सरकार - खासदार सुनील मेंढे
निवडणुकीपूर्वी भाजप- शिवसेना युती झाली होती. जनतेने युतीला मतदान केले. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगितले. जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र शिवसेना लोकभावनेच्या विरोधात गेली. आता जनतेच्या मनातील सरकार महाराष्ट्रात आले. शेतकरी हिताच्या सरकारमुळे महाराष्ट्राची प्रगती होणार यात शंका नाही, असे भंडारा- गोदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.