तुमसरात रुजली नेत्रदानाची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:03 AM2017-12-16T00:03:10+5:302017-12-16T00:03:30+5:30
मरावे परि किती रुपी उरावे, अशी उक्ती आहे. मात्र आजच्या आधूनिक युगात कुणी कुणाला आठवताना दिसून येत नाही.
राहुल भुतांगे ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मरावे परि किती रुपी उरावे, अशी उक्ती आहे. मात्र आजच्या आधूनिक युगात कुणी कुणाला आठवताना दिसून येत नाही. त्यामुळे मरणानंतर किर्तीच्या रूपाने नव्हे तर कमीत कमी अवयवाच्या रूपाने तरी आपण जिवंत राहू शकतो, या प्रेरणेने प्रेरीत होऊन येथील नेहरू नगरातील मधुकर सदाशिव भोयर (६६) यांनी मरणोपरांत नेत्रदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आलेले अंधत्व हे दूर सारता येते. आपण केलेल्या नेत्रदानामुळे आपल्या डोळ्यांनी ते जग पाहणार आहेत. त्यामुळेच नेत्रदानाला महादान संबोधण्यात आले आहे. रक्तदानाप्रमाणे नेत्रदानाविषयी पाहिजे, त्या प्रमाणात आजही जनजागृती झालेली नाही. त्यामुळे तुमसरातील काही तरूणांनी पुढाकार घेतला आहे.
जमेल त्या पध्दतीने नेत्रदानाविषयी जनजागृती केल्यामुळे अवघ्या पाच सहा महिन्याच्या कालावधीत तीन लोकांनी मरणोपरांत नेत्रदान केले आहे. त्यामुळे तुमसरात नेत्रदानाची संकल्पना रूजू लागली असल्याचे दिसून येत आहे.
यापुढेही तुमसर तालुक्यात मरणोपरांत नेत्रदानाविषयी जनजागृती अशीच सुरू राहणार असल्याचा मानस या तरूणांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला आहे.