३४ शाळा डिजिटल करून सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:06+5:302021-03-04T05:07:06+5:30
राज्यातील पहिलाच प्रयोग : नरेंद्र भोंडेकर यांचा पुढाकार भंडारा : खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील महागडे शिक्षण घेऊ न ...
राज्यातील पहिलाच प्रयोग : नरेंद्र भोंडेकर यांचा पुढाकार
भंडारा : खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील महागडे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थ्यांना जि. प. शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आ.नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा विधानसभा क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात ३४ शाळा डिजिटल करून सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना तयार केली आहे. बुधवारी विश्रामभवन भंडारा येथे जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक घेऊन तातडीने मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश आ. भोंडेकर यांनी दिले आहेत.
मास्टर प्लॅनमध्ये शाळेची इमारत, रंगरंगोटी, संगणक, एलसीडी, इंटरनेट कनेक्शन, डिजिटल क्लासरूम, शिक्षक व विद्यार्थ्यांना ड्रेसकोड, सुसज्ज वाचनालय व खेळाचे साहित्य या बाबींचा समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यात ३४ पंचायत समिती क्षेत्रांतील ३४ शाळांना डिजिटल करून त्यानंतर नगर पालिका क्षेत्रातील व उर्वरित गावातील सर्व सरकारी शाळा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांसोबत स्पर्धा करतील, असा निर्धार आ. भोंडेकर यांनी व्यक्त केला.
सर्व उपस्थित मुख्याध्यापकांनी हे आव्हान स्वीकारले असून आ. भोंडेकर यांनी तयार केलेली संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रोल माडेल ठरेल, अशी आशा यावेळी मुख्याध्यापक व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फीसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याच्या तक्रारी लाकडाऊन काळात येत होत्या. गरीब, होतकरू विद्यार्थी पैशाअभावी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्व बाबींवर उपाय म्हणून सरकारी शाळा अद्ययावत करण्याचा संकल्प आ. भोंडेकर यांनी केला आहे. गरीब विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे, जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी, शिक्षकांचे अतिरिक्त ठरण्याचे प्रमाण कमी व्हावे, विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबली पाहिजे यासाठी ही संकल्पना तयार केली असून सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत आ.भोंडेकर यांनी व्यक्त केले.
बॉक्स
निधी कमी पडू देणार नाही
२०२१-२२ या शैक्षणिक सत्राची सुरुवात जून महिन्यात होईल. त्यापूर्वीच संपूर्ण तयारी झाली पाहिजे, त्यासाठी लवकरच सरपंच, ग्रामसेवक, शिक्षण समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेतली जाईल. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ.भोंडेकर यांनी केले आहे.