कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:21+5:302021-07-05T04:22:21+5:30
तिरोडा : तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव ...
तिरोडा : तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला.
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी कृषी संजीवनी मोहीम २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत तालुक्यातील गावा-गावांत शेतीशी निगडित विविध विषयांवर कृषी विभाग व आत्माअंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आले. तसेच कृषी संजीवनी मोहिमेत तालुक्यात विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांविषयी तसेच भात पीक, नर्सरीपासून तर काढणी पश्चात तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रसार व प्रसिद्धीचे कार्यक्रम घेण्यात आले. १ जुलै रोजी पंचायत समिती सभागृह, तिरोडा येथे कृषी संजीवनी मोहीम समारोपीय कार्यक्रम साजरा करण्यात आला. उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अजय नष्टे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर, तिरोडा पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. गंगापारी, विस्तार अधिकारी अनुप भावे, कृषी अधिकारी वाय. बी. बावनकार, मंडळ कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत, विस्तार अधिकारी भायदे, कुर्वे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे (आत्मा) उमेश सोनेवाने, अरविंद उपवंशी, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाणे, धनेंद्र अटरे, सोनेवाने उपस्थित होते. प्रास्ताविकातून मोहाडीकर यांनी, कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत केलेल्या प्रचार प्रसिद्धीबाबत पाॅवर पॉईंट प्रेझेंन्टेशनने मान्यवर व शेतकऱ्यांना दाखविले. आमदार रहांगडाले यांनी, शेतकऱ्यांनी फक्त भात शेती करून चालणार नाही, तर आपल्या शेतीला औद्योगिक शेती कशी करता येईल, शेतीशी निगडित व्यवसाय कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच भात पिकासोबत इतर पिके घ्यावीत, असे सांगितले. विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अजून जोमाने कार्य करावे, असेही यावेळी सूचित केले. नष्टे यांनी, शेतकऱ्यांना भात पिकासोबत फळ व भाजीपाला पिकांचा समावेश करून आर्थिक स्थिती कशी उंचावता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.