ध्येय ठेवून घेतलेले शिक्षण आचरणात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:16 PM2017-12-28T22:16:35+5:302017-12-28T22:16:46+5:30

तरूण वयात वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर घनदाट जंगलातील आदिवासी लोकांना सेवा देण्यासाठी हेमलकसा, भामरागड भागात काम सुरु केले. यासाठी मी आपल्या वडिलांना (बाबा आमटे) यांना शब्द दिला होता.

Conduct learning goals | ध्येय ठेवून घेतलेले शिक्षण आचरणात आणा

ध्येय ठेवून घेतलेले शिक्षण आचरणात आणा

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ.प्रकाश आमटे : गांधी विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : तरूण वयात वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर घनदाट जंगलातील आदिवासी लोकांना सेवा देण्यासाठी हेमलकसा, भामरागड भागात काम सुरु केले. यासाठी मी आपल्या वडिलांना (बाबा आमटे) यांना शब्द दिला होता. त्यामुळे तरूण वयात पैसा हा सर्वस्वी नाही. त्यामुळे ध्येय ठेऊन शिक्षण घेतल्यानंतर ते आचरणात आणा, असे आवाहन हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक तथा प्रख्यात समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे यांनी केले.
कोंढा येथील गांधी विद्यालय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.आनंद जिभकाटे होते. अतिथी म्हणून प्रख्यात समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास शहारे, सरपंच डॉ.नूतन विलास कुर्झेकर, पंचायत समिती सदस्या कल्पना गभने, संजिवनी जिभकाटे, सहसचिव नरेंद्र कावडे, विश्वस्त नंदकुमार कावळे, सुदाम खंडाईत, मनोहर देशमुख, नरेश जिभकाटे, देवानंद मोटघरे, प्राचार्य एस.के.जिभकाटे उपस्थित होते.
यावेळी डॉ.प्रकाश आमटे म्हणाले, सारे भारतीय आपले बांधव आहेत असे आपण म्हणतो. हे बांधव जंगलात राहतात ते काय खात असतात याचा आपण अनुभव घेतला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आदिवासीबांधव मुंग्यांची चटणी खाऊन जीवन जगतात. त्यांना आरोग्य, शिक्षण यासारख्या मुलभूत सुविधा नव्हत्या. अशा हेमलकसा, भामरागडसारख्या आदिवासी भागात राहण्याचे ठरविले.
आदिवासी लोक आजारी पडले की तंत्रमंत्रावर विश्वास ठेवायचे. त्यांना आरोग्यसेवा देण्याचे ठरविले. यासाठी गोंडी, माडिया भाषा शिकले. त्यांच्यासारखे राहणीमान स्वीकारले. आदिवासींना वैद्यकीय सेवा देताना त्यांची सहनशक्ती मला दिसली. ४० ते १०० कि.मी. लांब खाटेवर रूग्ण माझ्या झोपडीत आणत. तेथे कोणतेही भूलतज्ज्ञ नसताना मी शस्त्रक्रिया करून रूग्णांना दुरुस्त केले. भामरागड येथे इंग्रजी शाळा सुरु केली. घरीच प्राणी पाळले. माझ्या प्राणीसंग्रहालयात तडस, रानकुत्रे, मगर, वाघ, सिंह, मोर, हरिण, साप हे प्राणी आहेत. ते मी लहानपणापासून पाळले. त्यांच्यासोबत माझा मुलगा, नातू खेळतानाचे अनुभव सांगितले.
यावेळी गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग नृत्य सादर केले. प्रास्ताविक रामदास शहारे यांनी केले. संचालन शिक्षक रतन लांडगे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य एस.के. जिभकाटे यांनी केले. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
शिक्षक भवन, तैलचित्राचे अनावरण
यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन स्मृती शिक्षक भवनाचे व संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्व.वि.दे. कावडे, स्व.गणपतराव कुर्झेकर, संस्थेचे सचिव स्व.का.ना. निखाडे यांच्या तैलचित्राचे उद्घाटन डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘स्वर्णपर्ण’ या स्मरणिकेचे, डॉ.कल्पना व सुधाकर बोरकर लिखीत ‘हृदयाची हाक’ या कवितासंग्रहाचे, डॉ.ईश्वर नंदपुरे यांच्या ‘सावल्या अंधारातल्या’ या काव्यसंग्रहाचे डॉ.आमटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Read in English

Web Title: Conduct learning goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.