वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:46+5:302021-07-29T04:34:46+5:30
भंडारा : शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी जिल्हा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक ...
भंडारा : शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी जिल्हा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक आहे. मात्र मागील चार /पाच वर्षांचा कालावधी होऊन देखील जिल्हा स्तरावर सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले नाही. नागपूर विभागातील अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणाविना वरिष्ठ व निवड श्रेणीपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर नि:शुल्क सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २७ जुलै रोजी जिल्हा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद भंडाराच्या प्राचार्या डॉ. राधा अतकरी यांना निवेदन दिले आहे.
नागपूर विभागातील खासगी अनुदानित संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षकांची अर्हताकरी सेवेची बारा व चोवीस वर्षे समाधानकारक पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ दिला जातो. यासाठी जिल्हा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागअंतर्गत सर्व शिक्षा अभियानमार्फत देण्यात येणारे २४ दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण करणे आवश्यक आहे. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून नागपूर विभागात असे कोणतेही प्रशिक्षण जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले नाही.
जिल्ह्यातील हजारो शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असूनही केवळ प्रशिक्षण झाले नसल्याने कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर नि:शुल्क सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करून शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, जागेश्वर मेश्राम, मनोज अंबादे, अनिल कापटे, दिनकर ढेंगे, अनंत जायभाये, पंजाब राठोड आदींनी निवेदन दिले.