काही प्रभागांत अविरोध, तर काहींमध्ये रिक्त जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:04+5:302021-01-08T05:54:04+5:30
आमगाव (दिघोरी) : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये काही वॉर्डांमध्ये अविरोध उमेदवार उभे आहेत; तर काही ...
आमगाव (दिघोरी) : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये काही वॉर्डांमध्ये अविरोध उमेदवार उभे आहेत; तर काही वॉर्डांमध्ये एकही उमेदवार उभे न झाल्याने त्या जागा रिक्त ठेवण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. या वेळेस सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे धोरण अवलंबिल्याने गावागावांत निवडणूक लढविण्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ते चूपचाप राहिले किंवा पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी यात निवडणुकीमध्ये रस घेतला नाही.
ज्यांना कुणाला सदस्यपद निवडून यायचे आहे त्यांनी स्वतः निवडणुकीला उभे राहून येणाऱ्या खर्चाचीसुद्धा जबाबदारी स्वीकारावयाची असल्याने अनेक लोकांनी निवडणूक लढविण्यासाठी अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे वाॅर्डात उमेदवार उभे करण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली. येणारा उमेदवार हा आपल्याच बाजूने राहील की नाही, याचीही शाश्वती नसल्याने अनेकांनी या निवडणुकीमध्ये रस घेण्याचे सोडून दिले असून, गावकऱ्यांसाठी एक मात्र चांगले झाले की, सामान्यांतील सामान्य माणूससुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो किंवा भविष्यात सरपंचपदी विराजमानही होऊ शकतो. याआधी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गटागटांत राजकारण विभागले जात होते. तसेच गटातील सरपंच कसा निवडून येईल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते.
तसेच निवडणुकीसाठी वारेमाप पैसा खर्च केला जात होता. आता मात्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न केल्यामुळे याबाबत आळा बसताना दिसत असून उमेदवार मी स्वतः कसा निवडून येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसून येत आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्याच्यात जसे दिवस जातील तसतसे निवडणुकीला जोर चढणार आहे. वाॅर्डात अनेकांनी सर्वच प्रवर्गांतील उमेदवार उभे केले असून, ते मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले तर काही जागा अनेकांना रिक्त सोडाव्या लागल्या; कारण त्या जागेसाठी उमेदवार मिळू शकले नाहीत.
अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे ठराविकांकडे गावातील राजकारणाची धुरा सांभाळत येत होती किंवा गावातील राजकारणामध्ये काही ठरावीक लोकच मोठ्या प्रमाणात रस घेत असताना दिसून येत होते; त्यामुळे त्या गावातील राजकारण एकाकडे एकवटले जात होते. आपल्या मर्जीतील माणसे निवडणुकीला उभी करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत होते व सरपंचपदीसुद्धा आपण स्वतः किंवा आपल्या मर्जीतील माणसाला बसविले जात होते. आता मात्र सरपंचपद कुणासाठी आरक्षित राहणार हे जाहीर न झाल्यामुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले गेले. यदाकदाचित सरपंचपद स्त्रीसाठी राखीव झाले तर आपली पंचाईत होऊ नये म्हणून अनेकांनी आपण स्वतः निवडणुकीला उभे न राहता आपल्या पत्नीला सदस्यपदासाठी उभे केल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे. ही निवडणूक अनेक बाबतींत निर्णायक ठरणार असून, वारेमाप खर्चाला आळा बसणार आहे, एवढे मात्र निश्चित.