पांढऱ्या डागावरील युनानी औषधांचा ठणठणाट
By admin | Published: January 15, 2017 12:33 AM2017-01-15T00:33:39+5:302017-01-15T00:33:39+5:30
पांढऱ्या डागांचा आजार बरा होत नसलेल्या रुग्णांनी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णाची हेळसांड : मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
सिराज शेख मोहाडी
पांढऱ्या डागांचा आजार बरा होत नसलेल्या रुग्णांनी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. येथे युनानी पद्धतीच्या औषधोपचाराने रूग्णांना लाभ झाला. मात्र आता या आजारावरील औषधीच रुग्णालयात उपलब्ध नसल्याने औषधीसाठी अशा रुग्णांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
शासनाने काही दिवसापूर्वी अनावश्यक औषधी खरेदी करून रुग्णालयाला पाठविली होती व ते प्रकरण बरेच गाजले होते. दुसरीकडे आवश्यक औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णांत असंतोष आहे. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात आयुष विभागांतर्गत आयुर्वेदिक, होमीयोपॅथी व युनानी औषधोपचार पद्धती सुरु आहे. मात्र यापैकी बहुतांश पद्धतीची औषधेच उपलब्ध नाहीत. मोजक्या स्वरुपात औषधांचा साठा येथे पाठविला जातो. जो आठ दिवसातच संपतो. या विभागातील शरीरावर पांढऱ्या डागांसाठी युनानी औषधोपचार पद्धती रामबाण उपाय ठरली आहे.
साधारणत: पांढरे व्रण असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. औषधोपचार करूनही हा आजार पूर्णत: बरा होत नाही. मात्र युनानी औषधाने त्यांच्यात आशेचा किरण उगवला आहे. या औषधोपचाराने साकोली तालुक्यातील एकोडी येथील ६५ वर्षीय महिलेला ९० टक्के लाभ झाला. त्यांना मागील १६ वर्षापासून हा आजार होता. त्यांनी अनेक प्रकारची औषधी घेतली. मात्र त्यांना लाभ झाला नव्हता.
तसेच रामटेक, खरबी, पालडोंगरी, रोहा, सालई (खुर्द), विहीरगाव, तुमसर आदी अनेक गावांमधील रूग्णांना युनानी औषधोपचाराने पांढऱ्या व्रणावर लाभ झाला आहे. त्यामुळे या प्रकारच्या रुग्णांची संख्या मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस वाढतच असून १०० च्या वर रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत.
मात्र पांढऱ्या डागावरील मुख्य सफुकेबर्स औषधच रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे काही रुग्णांनी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन औषध तुटवड्यामुळे होणारी व्यथा मांडली. मात्र अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. पांढऱ्या डागांच्या रुग्णांना युनानी औषधोपचार पद्धतीने त्यांना पुन्हा नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत केली. मात्र, औषधांचा तुटवडा असल्याने रूग्णांना आल्यापावली परतावे लागत आहे.
अनेकांच्या शरीरावरच पांढरे डाग नाहिसे होऊन सामान्यांसारखी त्वचा झाली आहे. वयात आलेल्या मुलींचे लग्न पांढऱ्या डागांमुळे जमत नव्हते. आता त्यांच्या जीवनात आशेचे किरण दिसायला लागले आहेत. पांढऱ्या डागांवरील औषधे जवळपास पाच ते सहा महिने द्यावी लागतात. तेव्हाच हा रोग पूर्णत: बरा होतो. मात्र रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने याबाबीची तातडीने गंभीर दखल घेऊन तुटवडा पडलेला औषधींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
या विषयावर मी नंतर बोलेन. सध्या मी मिटींगसाठी पुण्यात आलो आहे. ही औषध कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.
- डॉ.रवीकांत धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा
पांढऱ्या डागांवरील औषधांचा पुरवठा बंद आहे. तरी आम्ही रुग्ण कल्याण निधीमधून ही औषधे खरेदी करीत आहोत. मात्र १०० च्या जवळपास रुग्ण असल्याने तेवढी रक्कम खर्च करणे अपेक्षित नाही. एक दोन दिवसात पुन्हा ही औषधी खरेदी करणार आहोत.
- डॉ.हंसराज हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोहाडी.