संगणक परिचालक नियुक्तीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:51+5:302021-02-10T04:35:51+5:30
विरली (बु.) : संगणक परिचालकपदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता, या पदावर एका महिला उमेदवाराच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित ...
विरली (बु.) : संगणक परिचालकपदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता, या पदावर एका महिला उमेदवाराच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे प्रकरण लाखांदूर तालुक्यातील खैरी/घर ग्रामपंचायतमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनासह परीक्षार्थी उमेदवारांनी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार करून योग्य कारवाईची मागणी केली आहे.
प्राप्त तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी येथे कार्यरत संगणक परिचालकाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. मात्र, या राजीनाम्याविषयी ग्रामपंचायत प्रशासन अंधारात असतानाच या पदावर सदर संगणक परिचालकाच्या पत्नीची नियुक्ती झाल्याचे उघडकीस येताच, ग्रामपंचायतीने याविषयी आक्षेप घेतला. त्यानंतर, २७ जानेवारीला या पदासाठी गावातील ८ उमेदवारांकडून अर्ज मागवून त्यांची परिक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल जाहीर न करताच, पुन्हा त्याच महिला उमेदवाराची संगणक परिचालक पदावर नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीत काहीतरी घोळ झाल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासोबतच या प्रकरणी दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी सचिन कोरे, पद्माकर ढोमणे, भाष्कर फुंडे, झिंगर फुंडे, किन्नालाल लांजेवार, नारायण नान्हे, लोकेश बावने आदींनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली आहे.