‘बकरी ईद’च्या सुटीविषयी शिक्षण विभागाकडून संभ्रम
By admin | Published: September 23, 2015 12:46 AM2015-09-23T00:46:11+5:302015-09-23T00:46:11+5:30
मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या बकरी ईदच्या तारखेविषयी संभ्रमावस्था असल्याने अनेकांना सुटीविषयी शासकिय कार्यालयांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अधिकारी म्हणतात, प्रिंट मिस्टेक : सप्टेंबरऐवजी २५ आॅक्टोबरला दाखविला सण
भंडारा : मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या बकरी ईदच्या तारखेविषयी संभ्रमावस्था असल्याने अनेकांना सुटीविषयी शासकिय कार्यालयांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. कालदर्शिकेमध्ये हा सण २४ व २५ सप्टेंबरला दर्शविण्यात आला आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या परिपत्रकामध्ये हा सण २५ आॅक्टोंबर दाखविण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
परमेश्वराच्या भक्तीमार्गातील अस्सीम त्यागाचे बकरी ईद हे प्रतीक आहे. अरबी महिन्याच्या ‘जिल्काद’ या महिन्यामध्ये हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये अखिल विश्वात साजरा केला जातो. मुस्लिम धर्मात मुख्य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत यात परमेश्वर व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. पैकी हज हे कर्तव्य ज्याची कुवत आहे अशांसाठी आहे.
या कर्तव्यात मक्का येथे जाऊन 'खान-ए-काबा'चे दर्शन घेणे, तसेच अराफात व मुजदलिफा या ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घेणे यांचा समावेश यात आहे.
याबरोबरच परमश्रेष्ठ अल्लाहच्या मार्गात बकरीचे बलिदान देणे यांचा अंतर्भाव आहे. इस्लामचे आद्य प्रेषित हजरत इब्राहिम हे परमश्रेष्ठ अल्लाहचे निस्सीम भक्त होते. अल्लाहच्या मार्गात त्यांनी आपली सर्व संपत्ती व परिवाराचा त्याग केला. त्या गोष्टीचे स्मरण सर्व मुस्लिम बांधवांच्या अंगी बाणवण्याकरिता बकरी ईद साजरी केली जाते. बकरी ईद सणाला शासकीय सुटी जाहिर करण्यात आली आहे. मात्र कालदर्शिकेमध्ये २४ तारखेला बकरी ईद (मुंबई) तर २५ ला बकरी ईद (नागपूर) असे दर्शविण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या पत्रकांमध्ये हा सण २५ सप्टेंबरला असल्याने या दिवशी सुटी जाहिर करण्यात आली आहे. असे असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी सुटी जाहिर केलेल्या पत्रामध्ये बकरी ईद (ईदउल-झुआ) सण २५ आॅक्टोंबर २०१५ शुक्रवार असे दर्शविले आहे.
सदर सुट्यांचा पत्रावर सुट्यांमध्ये बदल करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करुन बदल करता येईल अशी टीपही लिहीलेली आहे. सदर पत्राच्या प्रतिलिपी शिक्षण विभागांशी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. यासंदर्भात इकबाल सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बकरी ईद सण शुक्रवारला असून तारीख २५ सप्टेंबर असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (नगर प्रतिनिधी)
सुटी जाहीर केलेल्या पत्रामध्ये बकरी ईद सण २५ आॅक्टोबर शुक्रवारला दर्शविण्यात आला आहे. दर्शविण्यात आलेल्या आॅक्टोबर या शब्दाऐवजी सप्टेंबर असे हवे होते. छपाई दरम्यान ही चूक झालेली आहे. बकरी ईद सण २५ सप्टेंबरला असून या दिवशी सुटी राहील. २४ तारखेला सर्व शाळा महाविद्यालय सुरु राहतील.
- किसन शेंडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, भंडारा