राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेस एकदिलाने उतरली प्रचार कार्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:50 PM2019-04-08T22:50:13+5:302019-04-08T22:59:25+5:30
लोकसभा निवडणुकीचा प्रचार चरम सिमेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार विजयासाठी परिश्रम घेत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत भंडारा-गोंदिया मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच समन्वय आहे. सर्व नेते एकदिलाने कामाला लागल्याचे दिसत असून भंडारा जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्रात तर काँग्रेसने आपले स्वतंत्र प्रचार कार्यालयही उघडले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून प्रचाराची सर्व सुत्रे हालत असल्याचे दिसत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार चरम सिमेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार विजयासाठी परिश्रम घेत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत भंडारा-गोंदिया मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच समन्वय आहे. सर्व नेते एकदिलाने कामाला लागल्याचे दिसत असून भंडारा जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्रात तर काँग्रेसने आपले स्वतंत्र प्रचार कार्यालयही उघडले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून प्रचाराची सर्व सुत्रे हालत असल्याचे दिसत होते.
भंडारा-गोंदिया राष्ट्रवादीचा गढ म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सर्व नियोजन केले जाते. लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी घोषित होण्यापासून काँगे्रस आणि राष्ट्रवादीत स्पष्ट समन्वय दिसत होता. आता निवडणूक प्रचार कार्यातही तेच दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात तीन आणि गोंदिया जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र आहे.
भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला स्वतंत्र प्रचार कार्यालयाची गरजच भासली नाही. तुमसर, भंडारा, साकोली येथे काँग्रेसने प्रचार कार्यालय उघडले नसले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहचतात. एकाच वाहनातून प्रचारासाठी जाण्याचे नियोजन करतात. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत प्रचारात समन्वय साधला जातो. नेत्यांच्या सभा असा की कोणत्या गावाला प्रचारासाठी जायचे असो सर्व विचारपूर्वक आणि एकदिलाने केले जाते. या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काँग्रेसच्या नेत्यांना तेवढाच सन्मान दिला जातो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयात काँग्रेसचे नेते सहजपणे वावरताना दिसत होते. कार्यकर्तेही तेवढ्याच हक्काने राष्ट्रवादीकडून प्रचाराच्या नियोजनात सहभाग घेत असल्याचे दिसत होते. आपल्या मित्र पक्षासाठी काँग्रेस एकदिलाने प्रचारात उतरली असून राष्ट्रवादीचा नव्हे तर काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे, अशा पद्धतीने नेतेमंडळी कामाला लागली. गावागावांत प्रचार सभांमध्ये सोबतच नेते फिरत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समन्वय पुर्णपणे दिसत आहे.
सुरूवातीपासूनच काँग्रेसची मदत
उमेदवारी घोषित झाली त्यादिवसापासून काँग्रेस आमच्या सोबत आहे. कोणतेही रूसवे फुगवे नाही. सोबतच प्रचाराचे नियोजन करून दौरे आयोजित केले जाते. सभानांही नेते, कार्यकर्ते उपस्थित असतात.
- नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी उमेदवार
खांद्याला खांदा लावून प्रचार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात काँग्रेस नेते, कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहे. दो जान मगर एक दिल अशी आमची अवस्था आहे. त्यामुळेच आम्हाला प्रचारासाठी स्वतंत्र कार्यालय उघडण्याचीही गरज पडली नाही.
- प्रेमसागर गणवीर, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस
विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षाच्या कार्यालयांत काय दिसले?
१. भंडारा : भंडारा येथे काँग्रेसने स्वतंत्र कार्यालय स्थापन केले नाही. राष्ट्रवादीच्याच कार्यालयात काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते एकत्र येत होते. सकाळपासूनच येथे गर्दी दिसून आली.
२. तुमसर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संयुक्त प्रचार कार्यालय नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात आहे. याठिकाणी कार्यकर्त्यांची सकाळपासूनच वर्दळ दिसत होती.
३. साकोली : येथेही संयुक्त प्रचार कार्यालय असून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते याठिकाणी एकत्र येतात. प्रचाराचे नियोजन करून प्रचारासाठी निघत असल्याचे दिसून आले.
४. गोंदिया : काँग्रेसने गोंदिया काँग्रेसच्या प्रचार कार्यालयात चांगलीच गर्दी दिसून आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते एकत्र विचारविनिमय करत होते.
५. तिरोडा: काँग्रेसने तिरोडा विधानसभा क्षेत्रात प्रचाराचे योग्य नियोजन केले असून जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय प्रचाराचे नियोजन करताना नेते दिसत होते.
६. अर्जुनी मोरगाव : येथील प्रचार कार्यालयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपसी समन्वय करून प्रचारासाठी निघताना दिसत होते. सर्वजण प्रचारात जाण्याच्या गडबडीत होते.
राष्ट्रवादीचा प्रचारासाठी काँग्रेस गावागावांत
भंडारा जिल्ह्यात आयोजित प्रचार सभांमध्ये राष्ष्ट्रवादींच्या नेत्यांच्या खांद्याला खांद्या लावून काँग्रेस नेते प्रचारात सक्रीय आहेत.