सभापती निवडणुकीत काॅंग्रेसचा कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 05:00 AM2022-05-15T05:00:00+5:302022-05-15T05:00:38+5:30
भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत १० मे राेजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. तर त्या बंडखाेर गटाला उपाध्यक्ष पद दिले. आता गुरुवार १९ मे राेजी सभापती पदाची निवडणूक हाेत आहे. माजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दाेन विषय समितीच्या सभापती पदाची निवड हाेणार आहे. यासाठी आता काँग्रेस पक्षांतर्गत माेठी माेर्चेबांधणी सुरू झाली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप बंडखाेरांना साेबत घेऊन काॅंग्रेसने जिल्हा परिषदेचा गड सर केला. मात्र आता सभापती निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच कस लागत आहे. पक्षांतर्गत नाराज सदस्य, जातीय समीकरण आणि बंडखाेरांना सामावून घेण्याची माेठी कसरत काँग्रेसच्या नेत्यांना करावी लागणार आहे. येत्या १९ मे राेजी सभापतीची निवडणूक हाेत असल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत १० मे राेजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. तर त्या बंडखाेर गटाला उपाध्यक्ष पद दिले. आता गुरुवार १९ मे राेजी सभापती पदाची निवडणूक हाेत आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दाेन विषय समितीच्या सभापती पदाची निवड हाेणार आहे. यासाठी आता काँग्रेस पक्षांतर्गत माेठी माेर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपल्याला सभापती पद मिळावे यासाठी नेत्यांची मनधरणी केली जात आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेत्यापुढे संतुलन राखत सभापती पद देण्याचे माेठे दिव्य आहे. काँग्रेसचे २१ सदस्य असून एकाला अध्यक्षपद मिळाल्याने आता २० सदस्यातून सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाेबतच भाजपमधून बंडखाेरी करून आलेले पाच आणि एक अपक्ष सदस्य यांनाही सामावून घ्यायचे आहे. तब्बल २५ जणांमधून चार जणांची निवड करण्याचे माेठे काम काँग्रेस पक्षासमाेर आहे.
सभापती निवडताना काँग्रेसमधील नाराज झालेल्या सदस्यांनाही खूश करण्याचा प्रयत्न हाेण्याची शक्यता आहे. यासाेबतच जातीय समीकरणाचे संतुलन राखण्याचे काँग्रेसपुढे माेठे आव्हान आहे. बंडखाेर भाजप गटाला जिल्हा परिषदेतील मलाईदार पद हवे आहे. त्यांचा डाेळा बांधकाम सभापती पदावर आहे. आता काँग्रेस बांधकाम सभापती पद आपल्याकडे ठेवणार की बंडखाेर गटाला देणार हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचे राहणार आहे.
सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी काँग्रेसकडून तुमसर तालुक्याच्या बपेरा गटाचे रमेश पारधी, लाखनी तालुक्याच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये आणि साकाेली तालुक्यातील वडद गटाचे मदन रामटेके यांच्या नावाची काॅंग्रेसकडून चर्चा आहे. तर बंडखाेर भाजपकडून तुमसर तालुक्यातील देव्हाडी गटाचे राजेश सेलाेकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र विकास फाऊंडेशनचे सर्वेसर्वा चरण वाघमारे कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालतात, हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
विराेधकांच्या खेळीकडे लागल्या नजरा
- सभापती निवडणुकीत ऐन वेळी राष्ट्रवादी आणि भाजपचा गट काेणती खेळी खेळणार याकडे लक्ष लागले आहे. २७ सदस्य जुळवून काॅंग्रेसने अध्यक्षपद मिळविले. मात्र त्याचवेळी २५ सदस्य विराेधात आहेत. सभापती पदासाठी २७ सदस्यांचे बहुमत असून, दाेन सदस्य फाेडण्यासाठी विराेधी गटांनी कंबर कसली आहे.
- काॅंग्रेसमध्ये अनेकजण सत्ता स्थापनेवरून नाराज आहेत. सभापतिपदाच्या निवडणुकीत ते काही गडबड करतात का याची चाचपणी विराेधी गटाकडून केली जात आहे. तर सत्ताधारी गट त्यांची मनधरणी करण्यात व्यस्त आहे. अशा स्थितीत काही सदस्य पुन्हा सहलीसाठी जाण्याच्या तयारीत आहे.