काँग्रेसने पाळला ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:41 PM2017-11-08T23:41:51+5:302017-11-08T23:42:09+5:30
गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कर रूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रूपये उद्योगपतींना वाटले, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला.
निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसने ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात काळ्या फिती लावून काँग्रेसने निदर्शने केली.
पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीची घोषणा करीत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे हाल झाले होते. नोटबंदीच्या उद्योगधंदे ठप्प पडले. पैसे असूनही बँकेतून पैसा काढता येत नसल्याने लग्नकार्य अडले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून केवळ मरण स्वस्त झाले, अशी टीका प्रदेश सचिव प्रमिला कुटे यांनी केली.
यावेळी नोटबंदीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निदर्शने कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन सीमा भुरे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, अनीक जमा पटेल, धनराज साठवणे, अजय गडकरी, अमर रगडे, राजकपूर राऊत, मनोहर उरकुडकर, आशिष पात्रे, स्वाती लिमजे, रमेश डोंगरे, भूमेश्वर महावाडे, सुनील गिº्हेपुंजे, शंकर राऊत, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, गणेश निमजे, जाबीर मालाधारी, नीळकंठ टेकाम, जनार्धन निंबार्ते, शंकर तेलमासरे, माणिकराव ब्राह्मणकर, मंगेश हुमणे व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जिल्हा, तालुका, शहर, बुथ कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, एनएसयूआय, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.