अध्यक्षपद काँग्रेसला ! प्रथमच आदिवासी महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:00 IST2025-01-28T11:00:06+5:302025-01-28T11:00:44+5:30

Bhandara : कविता उईकेंच्या रूपाने भंडाऱ्यात प्रथमच आदिवासी महिला जि.प. अध्यक्षपदी

Congress President's post! For the first time, a tribal woman gets the honor of being the president | अध्यक्षपद काँग्रेसला ! प्रथमच आदिवासी महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान

Congress President's post! For the first time, a tribal woman gets the honor of being the president

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने येथील जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात अध्यक्षपद पडले तर उपाध्यक्षपद महायुतीकडून राष्ट्रवादीने मिळविले. भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिलेला कविता उईके यांच्या रूपाने अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकनाथ फेंडर अविरोध निवडून आले.


जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २:३० वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभझाला. ५२ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात यावेळी अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेला आरक्षित होते. भाजपकडून महेश्वरी नेवारे यांचे नाव ठरले असतानाच ऐनवेळी जात वैधता प्रमाणपत्रावरून त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. महायुतीकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारच नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या कविता उईके अविरोध निवडून आल्या.


उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याचे लक्षात आल्याने काँग्रेसने आपल्या उमेदवाराचे नामांकनच भरले नाही. महायुतीकडून एकनाथ फेंडर यांचे एकमेव नामांकन आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. 


काँग्रेसलाही धक्का 
सभागृहात सर्वाधिक म्हणजे २१ सदस्य असतानाही उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला. काठावर असलेल्या सदस्यांना खेचण्यात काँग्रेसला अपयश आले. यात महायुतीमधील विशेषतः राष्ट्रवादीने चतुराईने राजकीय खेळी करून एकनाथ फेंडर यांना ओढले. परिणामतः संख्याबळात कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेसने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाची नामुष्की टाळली.


उईके यांना भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न 
नेवारे यांचे सदस्यपद रद्द होत असल्याचे संकेत मिळताच भाजपकडून कविता उईके यांना खेचण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महायुतीमधीलच काही मंडळींकडून यासाठी विरोध झाल्याची माहिती आहे. परिणामतः भाजपचे स्वप्न भंग पावले.


"गरीब, आदिवासी कुटुंबातील एका महिलेला अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली, हा आपल्या समाजाला मिळालेला सन्मानच आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाचा समतोल साधण्यावर आपला भर राहील." 
- कविता उईके, अध्यक्ष


"महायुतीमधील सर्व नेतेमंडळी आणि सदस्यांच्या सहयोगातून उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. ही जबाबदारी आपल्यासाठी महत्वाची आहे. त्या सर्वांना सोबत घेऊन काम करू." 
- एकनाथ फेंडर, उपाध्यक्ष

Web Title: Congress President's post! For the first time, a tribal woman gets the honor of being the president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.