काँग्रेस-राकाँचा बैलबंडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:17 PM2018-01-31T23:17:45+5:302018-01-31T23:18:33+5:30
भाजप सरकारने वारंवार पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ करून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा असा आरोप करून त्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संयुक्त बैलबंडी मोर्चा बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भाजप सरकारने वारंवार पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ करून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा असा आरोप करून त्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संयुक्त बैलबंडी मोर्चा बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर मोर्चेकरी बैलबंडीनेच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार सेवक वाघाये, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार अनिल बावनकर, राकाँचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, मधुकर लिचडे, प्राचार्य होमराज कापगते, जि.प. सभापती प्रेम वनवे, अजय गडकरी, राजकपूर राऊत, प्यारेलाल वाघमारे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
पेट्रोल डिझेलची दररोज दरवाढ होत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, धानाला हमीभाव यासह महत्वपूर्ण समस्या भाजप शासनाने रेंगाळत ठेवलेल्या आहेत. परिणामी शेतकºयांसह सामान्य जनतेची फरफट होत आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारला दुपारी १२ वाजता शास्त्री चौकातून बैलबंडी मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले यांनी केले. हा मोर्चा गांधी चौक ते जिल्हाधिकारी चौकात येऊन धडकला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. त्यानंतर त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी नाना पटोले म्हणाले, आजचे आंदोलन ही सुरूवात आहे. काँग्रेससोबत राष्ट्रवादी पक्षाशी चर्चा करून शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने आंदोलने उभारली जाणार आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून सामान्य जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. यावेळी माजी आमदार मधुकर कुकडे, सेवक वाघाये, अनिल बावनकर, धनंजय दलाल यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चेकरी बैलबंडीनेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
१५ बैलबंडीवर मोर्चेकरी
शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा बैलबंडीतून काढण्यात आला. यावेळी १५ बैलबंड्या या मोर्चात आणण्यात आले होते. पोळ्याच्या दिवशी बैलांना ज्याप्रमाणे सजविले जाते त्याचपद्धतीने बैलांना साज चढविण्यात आला होता. या बैलबंडीवर मोर्चा मार्गाक्रमण झाला.
काँग्रेस राकाँची दिलजमाई
पेट्रोल व डिझलचे वाढते भाव, वाढती महागाई, बेरोजगारी तथा शेतकºयांच्या समस्यांना घेऊन आजचे आंदोलन पार पडले. या आंदोलनात कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकाºयांची उपस्थिती अधिक जाणवली. मात्र आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची दिलजमाई झाल्याचे दिसून आले.