जाधव यांच्या सुटकेसाठी काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
By admin | Published: April 14, 2017 12:26 AM2017-04-14T00:26:04+5:302017-04-14T00:26:04+5:30
पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत
भंडारा : पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक त्रिमूर्ती तथा महात्मा गांधी चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले.
सदर स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात तरुण, महिला, वयोवृद्ध, महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय कमर्चाऱ्यांनी समर्थन दिले. स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी देण्यात आले. कुलभुषण जाधव यांच्यावर, ते भारतीय गुत्तहेर संस्थेचे हेर असून हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानात शिरले, अशा खोटया आरोपाखाली पाकिस्तानने अटक करून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला भरला. जाधव यांना बचावाची कुठलीही संधी न देता आंतररष्ट्रीय कायदा पायदळी तुडवून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भंडारा काँग्रेस कमिटी या निवेदनाद्वारे पाकिस्तानचा तीव्र निषेध करते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा हा निकाल मानवी हक्क आणि न्यायाच्या विरोधात आहे. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनीही कुलभुषण जाधव हे रॉ या भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचे पुरावे नसल्याचे पाकिस्तानी संसदेत सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जाधव यांना कायदेशीर मदत देण्यासाठी भारतीय वकालतीतील अधिकाऱ्यांनी १३ वेळा पाकिस्तान सरकारकडे परवानगी मागितली मात्र ती त्यांना देण्यात आली नाही. निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, आनंदराव वंजारी, मनोहर सिंगनजुडे, महेंद्र निंबार्ते, धनराज साठवणे, भूषण टेम्भूरने, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, प्रशांत देशकर, भाग्यश्री गिल्लोरकर, प्यारेलाल वाघमारे, सुनील गिऱ्हेपुंजे, प्रभुजी मोहतुरे, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, डॉ विनोद भोयर, गणेश निमजे, मुकंद साखरकर, नीलकंठ कायते, रेखा वासनिक, पुष्पा साठवणे, मंगेश हुमने आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)