काँग्रेसचा पायदळ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:17 AM2017-12-12T00:17:20+5:302017-12-12T00:18:33+5:30
पुंडलिक हिवसे ।
आॅनलाईन लोकमत
खरबी (नाका) : भाजप सरकारने मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे लहान व्यापारी व शेतकरी अडचणीत आला आहे. जाचक अटी लादून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे महापाप या सरकारने केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.
शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी खरबी ते नागपूर असा माजी आमदार सेवक वाघाये पाटील यांच्या नेतृत्त्वात जनआक्रोश पायदळ मोर्चा खरबी येथून काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल गुडधेपाटील, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी, महासचिव झिया पटेल, सरोज सेवक वाघाये, सभापती विनायक बुरडे, अॅड.शशीर वंजारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी प्रफुल गुडधे पाटील म्हणाले, भंडारा जिल्हा हा सधन जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु मागील दोन वर्षात या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे या सरकारला आता खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी मोर्चाचे आयोजक सेवक वाघाये म्हणाले, माझ्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. माझ्याकडे ५० एकर शेती असून पाण्याअभावी व तुडतुड्या, करपामुळे खंडीभर धान झाले नाही. ५० एकरातील धान पेटवून टाकले. माझ्यावर असा आघात झाला असेल तर माझ्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी असेल ही जाणीव झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचे ठरविले व आज विधानभवनावर पायदळ मोर्चा काढत असल्याचे सांगितले.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहभागी असलेला हा मोर्चा दुपारी २ वाजता नागपूरच्या दिशेने कूच केला. सायंकाळी ६ वाजता वडोदा येथे विश्रांतीनंतर मंगळवारला सकाळी ६ वाजता ही पदयात्रा नागपूररकडे निघणार आहे. सभेचे संचालन झिया पटेल व राजकपूर राऊत यांनी तर आयोजन जि.प. सदस्य प्रेम वनवे व खराडीचे सरपंच संजय हिवसे यांनी केले. या मोर्चात जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, तालुका अध्यक्ष, नगरसेवक भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.
या आहेत मोर्चेकऱ्यांच्या मागण्या
नैसर्गिक आपत्तीमुळे धानपीक नष्ट झालेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे. त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, जाचक अटी शिथिल करून सरसकट पीक विमा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. ओबीसीची नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी. कृषीपंपाचे वाढीव बिल कमी करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, धानाचे दर वाढवून दिले पाहिजे. तुडतुडा व किडीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे. शेतकºयांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी विधानभवनावर हा पायदळ मोर्चा आहे.
- माणिकराव ठाकरे,
उपसभापती, विधान परिषद.