काँग्रेसचा जनआक्रोश धडकला जिल्हा कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:52 PM2018-09-18T21:52:19+5:302018-09-18T21:52:37+5:30
वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि विविध प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा येथील जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडर आणि डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेले नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी, शेतमजूर संघटनेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि विविध प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा येथील जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडर आणि डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेले नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी, शेतमजूर संघटनेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील शास्त्री चौकातील दसरा मैदानातून शेकडोच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांचा मोर्चा निघाला. विविध शहरातील विविध मार्गाने फिरत हा मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहचला. या मोर्चात वाढत्या महागाईच्या विरोधात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. महिलांनी गॅसच्या वाढत्या किमतीच्या विरोधात गॅस सिलिंडरचे हातात कटआऊट घेतले होते. तर दसरा मैदानापासून निघालेल्या या मोर्चात बैलगाडीही सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या मोर्चात लग्न झालेले प्रतिकात्मक जोडपेही सहभागी झाले होते. येथील जिल्हा कचेरीसमोर हा मोर्चा पोहचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी शासनाच्या धोरणाविरुद्ध टीका करण्यात आली. राफेल विमान घोटाळा, इंधन दरवाढ, कर्जमाफी, बेरोजगारी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मोर्चात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, शहर कमेटीचे अध्यक्ष सचिन घनमारे, प्रफुल्ल गुडधे, डॉ.विनोद भोयर, मुजीब पठाण, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, प्रकाश पचारे, प्रेम वनवे, रेखा वासनिक, बंडू ढेंगरे, खुशाल गिदमारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चाने वेधले शहरवासीयांचे लक्ष
काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा शहरातील विविध मार्गातून काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडरचे कटआऊट, डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या अभिनव मोर्चाने भंडारा शहरवासीयांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे बैलगाडीमध्ये नवरी-नवरदेव प्रतिकात्मक स्वरुपात प्रवास करीत होते. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चाने आपल्या मागण्यांसाठी मार्गावरून जाताना शासनविरोधी घोषणा दिल्या.