प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 AM2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:11+5:30

नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडतो. दुसरीकडे, उमरेड-पवनी-कऱ्हांडला हा अभयारण्य आहे. वन्यजीव विभागाचे हे जंगल सोडले तर जिल्ह्यातील प्रादेशिक जंगलांमध्येही वाघ, बिबट्यासह वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे.

Conservation plan is required for regional forest animals | प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडा गरजेचा

प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडा गरजेचा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चौफेर पसरलेल्या वन आणि वन्यप्राण्यांमुळे या प्रदेशात विकासाची नांदी आहे; परंतु वन्यजीव विभागाकडे व्याघ्र संवर्धन आराखडा असला तरी प्रादेशिक जंगलातील प्राण्यांसाठी संवर्धनाचा आराखडाच नसल्याने वन्यप्राण्यांचे बळी जाणे नित्याचेच झाले आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात वर्षभरात सहा वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याची बाब अधिक स्पष्ट झाली आहे.
नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडतो. दुसरीकडे, उमरेड-पवनी-कऱ्हांडला हा अभयारण्य आहे. वन्यजीव विभागाचे हे जंगल सोडले तर जिल्ह्यातील प्रादेशिक जंगलांमध्येही वाघ, बिबट्यासह वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. प्रादेशिक जंगलांमध्ये वन्यजीवांचा प्रचंड भार असताना त्यांच्या संवर्धनासाठी अद्यापही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
१५ फेब्रुवारी २०२१ रोजी पवनी तालुक्यातील कलेवाडा येथे विहिरीत दोन बिबट्या मृतावस्थेत आढळून आले. १२ मे २०२१ रोजी भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गराडा बु. या गावाशेजारी एका सायफन विहिरीत वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत सापडले. आपल्या बछड्यांच्या शोधासाठी वाघीण सतत त्या सायफन विहिरीकडे येत होती. याच दिवशी पवनी तालुक्यातील धानोरी या गावात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. तर रावणवाडी जंगलात अस्वलाचा शव सापडला. एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि एका अस्वलाच्या मृत्यूने वन विभाग हादरले होते. त्यानंतर यावर्षी २९ जानेवारीला भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माथाडी परिसरात बी २ या वाघाची विद्युत प्रवाह सोडून शिकार करण्यात आली. त्यानंतर ५ फेब्रुवारीला पवनी तालुक्यातील पिंपळगाव/निपानी येथे बिबट्या, कोल्ह्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. 
३१ मार्च रोजी तुमसर तालुक्यातील बपेरा येथे अवयस्क वाघाची शिकार करण्यात आली. तर ४ एप्रिल रोजी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा शव सापडला. यातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना सोडली तर, उर्वरित सर्व घटना प्रादेशिक जंगलात घडलेल्या आहेत. तरीसुद्धा प्रादेशिक जंगलातील व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न केले गेलेले नाहीत. याकडे आता वनविभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

प्रादेशिक जंगलातील व्याघ्र संवर्धनासाठी नवीन धोरण तयार करण्याची गरज आहे. याशिवाय प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, संसाधनाची उपलब्धता, वन्यजीव व्यवस्थापनाचे धडे दिल्यास वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांच्या मृत्यूवर नियंत्रण मिळविता येऊ शकेल.
-नदीम खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा. 

 

Web Title: Conservation plan is required for regional forest animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.