राज्यघटना देशाचा सर्वाेच्च ग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:16 PM2018-01-20T22:16:13+5:302018-01-20T22:17:27+5:30
भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.
भारतीय घटनेची प्रस्तावना, उद्देशिका जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली, त्या अनावरणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वकील संघ भंडाराचे अध्यक्ष अॅड. कैलास भुरे, बार कॉन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी उपाध्यक्ष अॅड. अनिल गोवारदिपे, जिल्हा सरकारी वकील अॅड. व्ही. बी. भोले, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक डी.व्ही. देशमुख, भंडारा जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. राजकुमार उके, जिल्ह्यातील न्यायाशीध, वकील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
न्या. देशपांडे यांनी, भारतीय घटनेची प्रस्तावना भारतीय नागरिकांना कर्तव्य पालन काय व कसे करावे हे सांगते. त्यातील शब्दांना जिवंतपणा आणण्याचे कर्तव्य आपणा सर्वांचे आहे. उद्देशिका आपणच मुर्तीमंत स्वरूपात कृतीत आणायची आहे. त्यातून पळवाट काढता येणार नाही. हे काम केवळ न्याय संस्थेचे नाही. त्यासाठी स्वत:ला बदलवावे लागेल. स्त्रियांना न्याय वागणूक द्यावी. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी भंडाऱ्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी, राज्यघटना देशाची जीवनवाहीनी आहे. याचे पालकत्व न्यायपालिकेकडे आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण व कायद्याचे राज्य हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य हेतू आहेत. भारताची विविधता म्हणजे संस्कृती, भाषा, वंश, प्रांत, धर्म आणि जाती यांना एकत्र आणण्याच्या हेतुने नमूद केले आहेत. भारतीय घटना ही विषमता नष्ट करणारा केवळ कायदा नसून इतर कायदे करण्याचे अधिकार देणारी यंत्रणा सुद्धा आहे. त्यामध्ये बोलणे, वागणे, विचार व्यक्त करणे इत्यादीचे नागरिकांना मर्यादित स्वातंत्र्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
संचालन अॅड. शशीर वंजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रबंधक डी.व्ही. देशमुख यांनी मानले.