सिमेंट रस्ता बांधकामात गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:10 PM2018-12-09T22:10:57+5:302018-12-09T22:12:34+5:30
चार कोटी चाळीस लाख रुपये खर्चून शहरातील दुर्गा मंदिर ते गभने सभागृहापर्यंत तयार होत असलेल्या सिमेंट रस्ता बांधकामात डीएलसीची प्रथम लेयर अती अल्प प्रमाणात घालून जवळपास २० लाख रुपयांचा गैरव्यवहार सबंधित कंत्राटदाराने केला असून शहरवासीयांनी चौकशीची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : चार कोटी चाळीस लाख रुपये खर्चून शहरातील दुर्गा मंदिर ते गभने सभागृहापर्यंत तयार होत असलेल्या सिमेंट रस्ता बांधकामात डीएलसीची प्रथम लेयर अती अल्प प्रमाणात घालून जवळपास २० लाख रुपयांचा गैरव्यवहार सबंधित कंत्राटदाराने केला असून शहरवासीयांनी चौकशीची मागणी केली आहे.
शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये भंडारा -मोहाडी- तुमसर राज्यमार्ग, शहरातील दुर्गा मंदिर ते गभने सभागृहापर्यतचा चार कोटी ४० लाख रुपयांचा सिमेंट रस्त्याला समाविष्ट करण्यात आले होते. दरम्यान संबंधित कंत्राटदाराने १५ टक्के कमी दराने कामाची निविदा भरून काम मिळविले. कामाचे रनिंग बिल काढण्याची लगीनघाई करून भर पावसाळ्यात रस्ता बांधकाम सुरू केले होते. परीणामी रहदारी व धुळीचा त्रास तुमसरकराना सोसावा लागला. या बांधकामाबाबत अनेकदा निवेदने व तक्रारी देण्यात आले.
कंत्राटदाराने एकेरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम मापदंडात केले होते, मात्र दीड दोन महिन्याच्या अवकाशानंतर दुहेरी रस्त्याचे काम सुरू करताना सबधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात खालील लेयरमध्ये डीएलसी मटेरियलचा अति कमी प्रमाणात उपयोग करत आहेत. १० सेंमी च्या जाडीऐवजी ६ सेंमीची जाडी, तर कुठे ५ सेंमीच्या जाडीचा अनेक ठिकाणी उपयोग करीत आहे. या बांधकामात गैरव्यवहार करून कामाची दर्जाहीन काम करणे सुरू केले आहे. या कामात अंदाजे २० लाख रुपयांचा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. या संबधीची तक्रार संबधित विभागाला देण्यात आली असता बांधकाम विभागाचे अभियंता मात्रे यांनी मोका चौकशी केली. त्यात गैरव्यवहाराचे बिंग फुटले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, नगरसेवक राजेश ठाकूर, आशीष कुकडे, महेश निमजे, योगेश तुलसीनंद , मनीष पडोळे, गणेश सातपुते, गणेश पराते, रवी बुधे, शैलेश पडोळे, अमित लांजेवार, नीरज गौर, शिरीष लोहाबरे, उमा पारधी, गजेंद्र काळे मोहन मोहतुरे व शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
कंत्राटदाराने दर्जाहीन सिमेंट रस्ता बांधकाम वेळीच थांबवून योग्य मापदंडात केले नाही, तर काँग्रेस तर्फे कामबंद आंदोलन करण्यात येईल,
- प्रमोद तितिरमारे,
प्रदेश सचिव, काँग्रेस पक्ष.