राज्यमार्गावरील नालीचे बांधकाम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:44+5:302021-03-18T04:35:44+5:30
विशाल रणदिवे अड्याळ : कारधा ते निलज फाटापर्यंत या राज्य महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अड्याळ गावातून गेलेल्या या ...
विशाल रणदिवे
अड्याळ : कारधा ते निलज फाटापर्यंत या राज्य महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अड्याळ गावातून गेलेल्या या रस्त्याच्या विस्तारीकरणाचेही घोडे विविध कारणांनी रखडले आहेत. आता तर नालीच्या बांधकामावरून नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न झाला आहे. नालीचे अर्धवट व अपूर्ण बांधकाम आता नागरिकांच्या जीवावर बेतणार काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळ या गावाचा नावलौकिक आहे. येथे कित्येक महिन्यांपासून राज्य महामार्गाचे बांधकाम संथगतीने सुरु आहे. कधी हे बांधकाम पूर्ण होते असे आता अडयाळवासीयांना वाटू लागले आहे. तिथे दिवसभर धूळ व खड्ड्यातून प्रवास करावा अशी स्थिती आहे. नालीच्या बांधकामावरून ग्रामस्थ चांगलेच तापले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची लांबी जर वाढविण्यात आली नाही तर कदाचित पुढील काळात ग्रामवासीयांना मोठा त्रास तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर यांनीही राष्ट्रीय महामार्ग विभाग भंडारा यांच्याशी संबंधित विषयावर चर्चाही केली. मात्र यासंबंधी कुठला निर्णय होतो याकडे ही सरपंचांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचे बांधकाम पूर्णपणे अजूनही झालेले नाही. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण झाली नाहीत. तर गावात पाणी साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल, यात शंका नाही. पाण्याचा निचरा होणार नसल्याने समस्या वाढतील किंबहुना त्या आरोग्यासाठी मारक ठरतील, अशी बाबही चर्चेवेळी व्यक्त करण्यात आली.
या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत प्रशासन कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अंतर्गत चर्चा करीत लेखी मागणी की देण्यात आली. ही सर्व कामे पावसाळापूर्वी पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. तसेच नाल्यांचे बांधकाम होत असल्याने वाहतूकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे.
बॉक्स
अंतर्गत नाल्यांची समस्याही ऐरणीवर
राज्य महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम होत असताना गावातून येणाऱ्या अंतर्गत नाल्या या राज्यमार्गावरील नाल्यांना मिळणार आहेत. मात्र उंचीच्या फरकामुळे तांत्रिक अडचणी उपस्थित होत आहेत. लहान नाल्या कुठे जुळतील किंवा नाहीत ही एक मोठी समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावरही वारंवार सांगून सुद्धा वेळेच्या आधीच याकडे दुर्लक्ष केले तर ही मोठी समस्या उग्र रूप धारण करू शकते. नाल्यांच्या बाजूला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सुद्धा घालण्यात येणार आहे. आता त्या कामालाही ब्रेक लागला आहे. परिणामी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी चर्चा आता गावात ऐकावयास मिळत आहे. याकडे गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.