देव्हाडीत उड्डाणपूलाचे बांधकाम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:39 PM2017-12-10T22:39:51+5:302017-12-10T22:40:16+5:30
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे क्रॉसिंग वरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथपणे सुरू आहे. निधीची कमतरता हे प्रमुख कारण आहे.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे क्रॉसिंग वरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथपणे सुरू आहे. निधीची कमतरता हे प्रमुख कारण आहे. १ कोटी २६ लाखांचे कामे पूर्ण केल्यावर केवळ ४६ लक्ष येथे देण्यात आले. तुमसर-गोंदिया मार्गावरील उड्डाणपुल बांधकाम डोकेदुखी ठरत आहे. पर्यायी रस्त्यावर खड्यामुळे आजार बळावला आहे.
देव्हाडी येथे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर दोन वर्षापुर्वी प्रत्यक्ष उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली. राज्य शासन तथा रेल्वे मंत्रालय यांचा हा संयुक्त उड्डाणपूल आहे. राज्य शासन २४ कोटी तर रेल्वे १४ कोटी रूपये खर्च करणार आहे. सुमारे ४० कोटींचा हा उड्डाणपूल आहे. सध्या येथील कामे संथगतीने सुरू आहेत. १ कोटी २६ लाखांचे कामे केल्यानंतर केवळ ४७ कोटी रूपये येथे देण्यात आले. केंद्र सरकार येथे निधी उपलब्ध करून देतो.
रेल्वेने १० दिवसापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. राज्य सरकार दोन्ही बाजूला अॅप्रोचचे बांधकाम करीत आहे. त्यात भराव भरून बांधकाम अशी कामे आहेत. उड्डाणपूलाचा पर्यायी मार्ग येथे तयार करण्यात आले. त्यावर खड्डे पडले आहेत. धूलीकरणामुळे ग्रामस्थ तथा प्रवाशी त्रस्त झाले असून आजार बळावला आहे. मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक सुरू राहते. त्यामुळेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला.
खड्ड्यात गिट्टीचे पॅचेस घालून डामरीकरण करण्याची येथे नितांत गरज आहे. वृद्ध व लहान मुलांना दम्याचा आजार येथे बळावण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाने येथे तात्काळ निधी उपलब्ध करून उड्डाणपूल पूर्णत्वाकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. रहदारी जास्त असल्याने पर्यायी व्यवस्था येथे कुचकामी ठरत आहे. प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे.
देव्हाडी उड्डाणपुलाचे कामे सध्या सुरू असून ३ कोटी ८२ लाखांचे देयके कंत्राटदाराने सादर केले आहेत. ४७ लाखांचे देयके त्यांना मिळाली आहेत. उपलब्ध निधीनुसार त्यांना देयके मिळत आहेत.
-बी.आर. पिपरेवार,
कनिष्ठ अभियंता, उड्डाणपूल
बांधकाम विभाग, नागपूर.
देव्हाडी उड्डाणपूलाकरिता केंद्र शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून उड्डाणपुल लवकर पूर्ण करावे. रहदारीचा रस्ता असल्याने प्रत्येकाला येथे मोठा त्रास होतो. रेल्वे फाटक बंदमुळे वाहनांच्या रांगा येथे राहतात. अपघाताची येथे शक्यता अधिक आहे. विकासात्मक कामाला निधी द्यावा.
- के.के. पंचबुद्धे,
जिल्हा परिषद सदस्य देव्हाडी.