घरकुलांसाठी वाळूचा ठणठणाट, डेपो बंदमुळे बांधकाम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:25 PM2024-09-20T13:25:05+5:302024-09-20T13:29:42+5:30
लाभार्थ्यांची फरफट : महसूल व खनिकर्म विभाग लक्ष देणार काय ?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गतवर्षी २५ शासकीय वाळू डेपोंना पर्यावरण विभागासह शासनाची परवानगी मिळाली होती. त्यापैकी १९ वाळू डेपो सुरू करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात केवळ ११ डेपो सुरू असून ८ बंद आहेत. त्यातच रेतीचा चोरटा व्यापार पूर्णतः बंद पडला आहे. वाळूअभावी घरकुलांचे बांधकाम प्रभावित झाले आहेत. लाभार्थ्यांकडे वाळूचा साठा नसल्याने बांधकामे बंद आहेत. महसूल व जिल्हा खनिकर्म विभाग याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्ह्यात कधी नव्हे अशी वाळू टंचाई सर्वत्र जाणवत आहे.
घरकुल लाभार्थ्यांना स्वस्तात मिळणारी वाळू महागली असून कुठेही मिळेनाशी झाली आहे. शासकीय वाळू डेपोत अधिकचा वाळू साठा उपलब्ध असताना कमी साठा असल्याचे भासविले जात आहे. त्यातच शासकीय वाळू डेपो सुरू असलेल्या ठिकाणांवरून घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळेनाशी झाली आहे. वाळू अभावी हाहाकार उडाला असून अनेकांच्या घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहेत. त्यामुळे बांधकाम पूर्ण करायचे कसे, असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.
बंद असलेले शासकीय वाळू डेपो
पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात १९ शासकीय वाळू डेपो सुरू होती. परंतु, पूरपरिस्थिती व अन्य कारणांनी जिल्ह्यातील ८ वाळू डेपो बंद पडले आहेत. बंद पडलेल्या डेपोंमध्ये चारगाव, निलज बुज, कान्हळगाव, मुंढरी बुज, गुडेगाव, बेलगाव, कोथुर्णा, मोहरना आदींचा समावेश आहे.
मोहाडी तालुक्यात परिस्थिती बिकट
मोहाडी तालुक्यात सद्यस्थितीत वाळूची तीव्र टंचाई आहे. तालुक्यात मोहगाव देवी येथील शासकीय वाळू डेपो वगळता निलज बुज, कान्हळगाव, मुंढरी बुज आदी डेपो बंद असल्याने घरकुल लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. वाळूअभावी बांधकामे बंद पडली आहेत.
तातडीने डेपो सुरू करण्याची अपेक्षा
जिल्ह्यात रेतीचा चोरटा व्यापार बंद पडला आहे. त्यातच मोहाडी तालुक्यात शासकीय वाळू डेपो मोठ्या प्रमाणात बंद आहेत. घरकुलांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी तालुक्यातील बंद असलेले डेपो तातडीने सुरू करण्याची अपेक्षा घरकुल लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
सुरु असलेले शासकीय वाळू डेपो
- जिल्ह्यात सद्यस्थितीत १९ पैकी ११ शासकीय वाळू डेपो सुरु आहेत. सुरू असलेल्या वाळू डेपोंमध्ये लोभी, सोंड्या, मांडवी, आष्टी, मोहगाव देवी, फुलमारा, अंतरगाव, पळसगाव, वाकल, परसोडी व खंडाळा आदींचा समावेश आहे.
- नदीत पाणी असल्याने वाळू उपसा त्याप्रमाणात होत नाही. मग ही सर्व रेती डम्पिंग केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रेती डम्पिंग झाली केव्हा?
घरकुलांसाठी १५ टक्के स्टॉक राखीव
प्रत्येक शासकीय वाळू डेपोवर घरकुल लाभार्थ्यांसाठी १५ टक्के स्टॉक राखीव असल्याचे प्रशासना- कडून सांगितले जाते. परंतु, वाळू डेपो चालकांकडून तसेच प्रशासना- कडून घरकुल लाभार्थ्यांना वाळू, उपलब्ध केली जात नाही, ही शोकांतिका आहे. घरकुल लाभार्थ्यांत वाळूसाठी आक्रोश व्यक्त होत आहे.