आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम होणार
By admin | Published: December 28, 2015 12:54 AM2015-12-28T00:54:10+5:302015-12-28T00:54:55+5:30
चुल्हाड येथील प्राथमिक आरोगय केंद्र इमारत बांधकामासाठी राज्याच्या आरोग्य विभागात प्रस्तावित ५ कोटी ५० हजार रुपये
चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड येथील प्राथमिक आरोगय केंद्र इमारत बांधकामासाठी राज्याच्या आरोग्य विभागात प्रस्तावित ५ कोटी ५० हजार रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित बांधकामाची ई-टेंडरिंग प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
सिहोऱ्यात ग्रामीण रुग्णालय मंजुरी नंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानांतरण चुल्हाड गावात करण्यात आले आहे. या गावात असणाऱ्या आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रशासकीय कारभार सुरु आहे. या इमारतीत जागा आणि खोल्यांचा अभाव असल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध करतांना जिकरीचे ठरत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना वऱ्हाड्यांचा आधार घेण्याची पाळी आली आहे. उर्वरित खोल्यात प्रशासकीय कारभार सुरु आहे. यामुळे आरोग्य केंद्र नावापुरताच असल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. या केंद्रांतर्गत आठ गावात उपकेंद्र आहेत. या शिवाय पूरग्रस्त गावांची संख्या मोठी आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्याची ओरड आहे.
निधी आणि जागेचा अडचण असल्याने या आरोग्य केंद्राचा प्रश्न गेल्या सात वर्षापासून रेगांळत आहे. प्रसस्त इमारत बांधकाम झाले नसल्याने या आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया प्रभावित झाली आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असा औषध वाटपाचा फार्म्यूला या दवाखाण्यात सुरु करण्यात आलेला आहे.
आरोग्य केंद्र असतांना सुविधा मात्र नगण्य असल्याने कार्यरत यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहे. या गावात जागेचा अभाव आहे. झुडपी जंगल अशी नोंद असणारी पाच एकर हून अधिक रिक्त जागा आहे. या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाला मंजुरी देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केली आहेत. जिल्हा परिषद सदस्य प्रतिक्षा उमेश कटरे यांनी आरोग्य केंद्राचा प्रश्न सभागृहात मांडला आहे.
आरोग्य केंद्र इमारत बांधकामात येणारी जागेची अडचण निकाली काढण्यात आली आहे. झुडपी जंगल जागेत या इमारतीचे बांधकाम होणार आहे. प्रस्तावित आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी ५ कोटी ५० हजार रुपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. या कृती आराखडयात कर्मचाऱ्यांची वसाहत आदीचे समावेश करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सुविधेत ‘अच्छे दिन’ येणार आहेत. निधी आणि बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर ई-टेडरिंग प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या आरोग्य केंद्र अंतर्गत सुरु असलेल्या उपकेंद्रात आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांच्या जागा रिक्त आहे. अनेक उपकेंद्राचा डोलाश प्रभारावर सुरु आहे. यामुळे गर्भवती महिलांचे लसीकरण, नवजात बाळांची तपासणी व लसीकरण प्रभावित होत आहेत. योग्य मार्गदर्शनासाठी महिलांची भागम भाग सुरु झाली आहे. आरोग्य सुविधाचा बोजवारा वाजला आहे. आग्ल दवाखान्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात ओपिडी काढण्यासाठी मदत करीत आहे. यामुळे औषधी निर्माता रुग्णांवर औषधोपचार करित असल्याने रुग्णाचे नातेवाईक हमरी-तुमरी करित असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)