मुंढरी-रोहा पुलाचे बांधकाम लवकरच होणार
By admin | Published: March 29, 2017 12:42 AM2017-03-29T00:42:51+5:302017-03-29T00:42:51+5:30
मुंढरी ते रोहा पुलासाठी केंद्र सरकारने निधी दिला. मुख्य अभियंत्याच्या पाहणीनंतर टेंडर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
कामकाजाची केली पाहणी : मुंढरी बुज. व्यसनमुक्ती मंदिराला खा.पटोलेंची भेट
करडी (पालोरा) : मुंढरी ते रोहा पुलासाठी केंद्र सरकारने निधी दिला. मुख्य अभियंत्याच्या पाहणीनंतर टेंडर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी कामाला सुरुवात होईल. २०२० पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे, प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथील पर्यटनस्थळ व्यसनमुक्ती कृषी प्रार्थना मंदिराला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. गुढीपाडव्याचे निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे तसेच व्यसनमुक्ती मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कामकाजाची माहिती खा.पटोले यांनी मंदिराचे प्रमुख पुंडलीकबाबा यांचेकडून जाणून घेतली. केंद्रीय महामार्ग निधीतून वैनगंगा नदीवर मुंढरी ते रोहा दरम्यान होऊ घातलेल्या पुलाची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंता विजया सावरकर, अभियंता तलमले यांचेकडून जाणून घेतले. यावेळी नागरिकांनी आपल्या भागातील विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. वैनगंगा नदीवरील पुलासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. ५५० मीटरपेक्षा लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी बजेटमध्ये ४० कोटींची तरतूद केल्याचे सांगितले. या पुलामुळे मोहाडी तालुक्यातील दोन्ही भाग आपसात जोडले जाणार असून नागरिकांसाठी पुल उपयोगी ठरणार आहे. यावेळी पुंडलीक बाबा, जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे, के.बी. चौरागडे, आशिष डोहळे, अश्विन डोहळे, विकास नशिने, हरिभाऊ पंचबुद्धे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)