‘जलयुक्त’ गाळातून रस्ते, बाजार व शाळा पटांगणाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:02 AM2018-10-01T01:02:11+5:302018-10-01T01:02:34+5:30
जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसिंचनाच्या सोयीच निर्माण झाल्या नाहीत तर गावातील मूलभूत सुविधांच्या निर्माणासाठीही हातभार लागला. यातील गाळातून देव्हाडा, पालोरा व करडी गावात खडकाळ शेती उपजावू झाली.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसिंचनाच्या सोयीच निर्माण झाल्या नाहीत तर गावातील मूलभूत सुविधांच्या निर्माणासाठीही हातभार लागला. यातील गाळातून देव्हाडा, पालोरा व करडी गावात खडकाळ शेती उपजावू झाली. पांदन, रस्ते, घरांच्या जागा तयार झाल्या. देव्हाडा व करडी येथे आठवडी बाजारांच्या जागा तर पालोरा येथे जिल्हा परीषद हायस्कूल व प्राथमिक शाळेचे पटांगण तयार झाले. यामुळे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांचा श्रम, वेळ व लाखोंचा खर्च वाचला.
सन २०१६-१७ मध्ये करडी गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गणपती तलावाचे ‘मॉडेल’ तलावात रुपांतरीत झाले. सुमारे ४० लक्ष रुपयांतून दोनदा गाळाचा उपसा व खोलीकरण करण्यात आले. निघालेल्या सुपिक गाळाचा उपयोग शेतकºयांनी स्वत:च्या साधनाने शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी केला. हजारो टन गाळ खडकाळ जमिनीत ओतून निकृष्ट शेतजमीन उत्कृष्ट केली.
करडी ग्रामपंचायतीचे माध्यमातून दर सोमवारला आठवडी बाजार भरविण्याचे ठरविण्यात आले. परंतु बाजाराची निर्धारित जमीन अतिशय खोलगट व चिखल पाण्याने बरबटलेली होती. ग्रामपंचायतीने बाजाराच्या निर्माणासाठी स्वखर्चातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळाचा भरणा केला.
आज तेथे सुविधांनी परिपूर्ण असे सपाट मैदान तयार होवून आठवडी बाजार भरविला जात आहे. सन २०१७-१८ मध्ये पालोरा येथे सुद्धा जलयुक्तच्या गाळातून ग्रामस्थांनी शेतीची सुपिकता वाढविण्याबरोबर घरबांधणीच्या जागा व वाळीच्या जागा उपयुक्त करून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून जि.प. प्राथमिक व हायस्कुलचे प्रांगणातील खोलगट भागात भरण भरून खेळाचे मैदान तयार करण्यात आले. देव्हाडा बुज ग्रामपंचायतीने बुधवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडी बाजाराची व्यवस्था केली. तीन्ही गावातील चिखलाने माखलेल्या पांदन रस्त्यांवर तसेच नाल्यांच्या काठावर मुरुम घालण्यात आल्याने रस्ते शेती उपयोगी ठरले आहेत. तलावाच्या पाळींची दुरुस्ती तसेच कालव्यांची व पाटांची दुरुस्ती यातून करण्यात आली. तसेच शेकडो ग्रामस्थांनी घराचे व परिसराचे भरण भरले आहे.