परवानाधारक देशी दारू विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:16+5:302021-08-02T04:13:16+5:30
कोरोनाकाळात राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी तथा अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने बंद परवानाधारक देशी दारू दुकाने व बीअर बार उघडण्यास ...
कोरोनाकाळात राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी तथा अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने बंद परवानाधारक देशी दारू दुकाने व बीअर बार उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे, तर काही जिल्ह्यांतील दारूबंदीही उठविली आहे. लाखनी तालुक्यात लाखनी, पोहरा, पालांदूर व पिंपळगाव येथे नऊ परवानाधारक देशी दारू दुकाने आहेत. यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क व अबकारी विभागाचे आहे. देशी दारू दुकाने उघडण्याची वेळ शासनाने निश्चित केली असली तरी वेळेपूर्वीच दुकाने उघडली जातात व उशिरा बंद केली जात आहेत. त्यामुळे नियमाचे पालन केले जात नाही. शनिवार, रविवारला दारू विक्री बंद ठेवण्याचे निर्देश असले तरी मागील दाराने चोरटी दारू विक्री केली जात असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क व अबकारी विभागास माहिती असताना कानाडोळा केला जात आहे. परवानाधारक देशी दारू दुकानातून ७५० मिली, १८० मिली व टिल्लू ७० मिली, अशा ३ प्रकारांत देशी दारू विक्री केली जाते. पैकी १८० मिलीची छापील किंमत ६० रुपये असताना ७० रुपयांत विक्री केली जाते. तसाच प्रकार टिल्लूचे बाबतीतही आहे.
बॉक्स
नियमबाह्य प्रकारावर लगाम लावणार तरी कोण?
परवानाधारक देशी दारू दुकाने व बीअर बारवर संनियंत्रणाचे काम राज्य उत्पादन शुल्क व अबकारी विभागाचे असले तरी वरदहस्त व संगनमताने असला नियमबाह्य प्रकार सुरू आहे. परवानाधारक आपले कोणी काही बिघडवू शकत नाही. या तोऱ्यात वावरतात. महिन्याच्या ठरावीक दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी हप्ता वसुलीसाठी देशी दुकानात दिसतात. इतर दिवशी त्यांचे दर्शन दुर्मिळ होते, अशी चर्चा होत आहे. या प्रकाराने ग्राहकांची आर्थिक लूट होत असून, ग्राहक संरक्षण कायद्याचेही उल्लंघन होत असले तरी राज्य उत्पादन शुल्क आणि अबकारी विभागाकडून या नियमबाह्य प्रकाराला लगाम लावण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. अधिक किमतीने दारू विक्री करणाऱ्या परवानाधारकांचा बंदोबस्त होणे गरजेचे झाले आहे.