गॅस एजन्सी समोर ग्राहकांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:41 AM2019-02-23T00:41:15+5:302019-02-23T00:42:28+5:30
भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोहाडी येथील सिलिंडर वितरण केंद्रासमोर राडा केला. नागरिकांचा रौद्र रूप पाहून येथील स्थानिकांनी हस्तक्षेप करून तहसीलदार व ठाणेदारांना सूचना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाड़ी : भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोहाडी येथील सिलिंडर वितरण
केंद्रासमोर राडा केला. नागरिकांचा रौद्र रूप पाहून येथील स्थानिकांनी हस्तक्षेप करून तहसीलदार व ठाणेदारांना सूचना दिली. शेवटी वितरकांनी नमते घेत सर्व ग्राहकांना सिलिंडर वितरित केले. मात्र येथील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन निशा गॅस एजन्सी वरठीचा परवाना रद्द करून मोहाडीला नवीन गॅस वितरक नियुक्त करण्याची मागणी केली.
मोहाडी येथे भारत पेट्रोलियम कंपनीचे जवळपास दीड ते दोन हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांना निशा गॅस एजन्सी वरठीतर्फे सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र गॅस वितरकांद्वारे ग्राहकांना नेहमी वेठीस धरण्याचा प्रकार गत एक वर्षापासून सुरू होता. नियमाप्रमाणे गॅस सिलिंडर घरपोच मिळायला हवा, मात्र कार्यालयातून सिलिंडरचे वाटप केले जात असतानाही ग्राहकांकडून २० रुपये अधकचे घेतले जात होते. वरठी गोडाऊन येथून मोहाडीला पाठविण्यात येत असलेल्या सिलिंडरच्या गाडीचा कोणताही वेळ नव्हता. कधी सकाळी, कधी दुपारी व कधी सायंकाळी मोहाडीला सिलिंंडरची गाडी येत होती. तसेच गाडी येण्याच्या नेम नव्हता. ग्राहक सकाळपासूनच आपापले सिलिंडर घेऊन मोहाडी वितरण कार्यालयासमोर रांग लावून उभे राहत होते. सिलिंडरची गाडी केव्हा येणार हे विचारण्याकरिता वरठी कार्यालयात फोन केला तर तेथील आॅपरेटर समाधानकारक उत्तर देत नव्हते. ग्राहकांशी अरेरावीने वागायचे. त्यामुळे आज गाडी येणार की नाही हे कळायला वाव नव्हता, एका दिवशी पत्रकारानी फोन करून सिलिंडर गाडी केव्हा येणार, असे विचारले असता आॅपरेटरनी त्यांच्या सोबत अभद्र व्यवहार केला. कधी कधी तर दिवसभर रांगेत उभे राहून आपले सिलिंडर परत नेण्याची वेळ अनेक ग्राहकावर आली. सिलिंडर देताना त्याचे वजन करून देण्यात येत नव्हते. पावती सुद्धा देण्यात येत नव्हती, अनेक तक्रारी असल्याने शेवटी ग्राहकांनी त्रासून चांगलाच राडा केला. आता तहसीलदार यावर कोणती कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
घरपोच मिळणार सिलेंडर
गॅस सिलिंडर ग्राहकांनी राडा केल्यामुळे व स्थानिक पत्रकारांनी हस्तक्षेप केल्यामुळे तहसीलदार व ठाणेदार मोहाडी यांनी वितरकाला तहसील कार्यालयात बोलावून चांगलीच समज दिली. तसेच कारवाई करण्याचे संकेत दिल्यावर आता ग्राहकांना सिलिंडर घरपोच देण्यात येईल, अशी कबूली वितरकांनी दिली. तसेच सर्व ग्राहकांना आता सिलिंडर वजन करून देण्यात येईल. परंतु सर्व ग्राहकांनी बुकिंग करणे आवश्यक राहील. मोहाडी वितरण कार्यालयातून कोणालाही सिलिंडर वितरीत करण्यात येणार नाही, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.
अवैध सिलिंडर विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश
मोहाडी येथील भारत गॅस वितरण केंद्रातून अवैध गॅस सिलिंडर विक्रेते नेहमी पाच ते सहा सिलेंडर उचलत होते अशी तक्रार होती, असे अवैध सिलिंडर विक्रेत्यांची संख्या येथे जवळपास पाच ते सहा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वीस ते पंचवीस सिलिंडर अवैध विक्रेते घेऊन जात होते. त्यामुळे इतर ग्राहकांना सिलिंडर मिळत नव्हते. नंतर हे अवैध सिलिंडर विक्रेते गरजू व्यक्तींना अव्वाचे सव्वा दराने विकत होते, ही बाब पत्रकारांनी तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना अशा व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोबतच हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडर वापरणाºयांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
अवैध सिलिंडर विकताना जर कुणी आढळले तर त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई केली जाईल. उपहारगृहाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. घरपोच सिलिंडर देण्याचे सूचना निशा गॅस एजंसी वरठीला केल्या आहेत.
- नवनाथ कातकेडे,
तहसीलदार, मोहाडी