दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:00 AM2021-10-28T05:00:00+5:302021-10-28T05:00:29+5:30
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीच्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. भंडारा शहरातील बाजारपेठ अशा गर्दीने फुलली आहे. संपूर्ण परिवार खरेदीसाठी सकाळपासूनच बाहेर निघत असल्याचे चित्र आहे. बडा बाजार, मेन लाइन या परिसरात तर गत दोन दिवसांपासून पाय ठेवायलाही जागा नाही. सर्वाधिक गर्दी दिसती ते कापड दुकानांमध्ये.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकटाचे काळे ढग दूर होताच सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी प्रत्येक जण घराबाहेर पडत आहे. त्यामुळे भंडारा शहरातील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली आहे. सर्वाधिक गर्दी कापड दुकानात दिसत असून दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी दुकाने सजली आहेत.
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीच्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. भंडारा शहरातील बाजारपेठ अशा गर्दीने फुलली आहे. संपूर्ण परिवार खरेदीसाठी सकाळपासूनच बाहेर निघत असल्याचे चित्र आहे. बडा बाजार, मेन लाइन या परिसरात तर गत दोन दिवसांपासून पाय ठेवायलाही जागा नाही. सर्वाधिक गर्दी दिसती ते कापड दुकानांमध्ये. लहान मुलांसह महिला कपडे खरेदीत व्यस्त असल्याचे चित्र प्रत्येक दुकानात दिसत आहे. दीड वर्ष ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या दुकानदारांच्या चेहऱ्यावरही या दिवाळीने नवचैतन्य आणले आहे.
दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकही भंडारा शहरात दाखल होत आहेत. मात्र सर्वच वस्तूंचे वाढलेले दर पाहून अनेकांचे डोळे पांढरे होण्याचीही वेळ आली आहे. गतवर्षीपेक्षा सर्वच वस्तू २० ते ३० टक्क्यांनी महागल्याचे दिसत आहे. परंतु दिवाळीच्या आनंदापुढे आणि त्यातही कोरोना संकट नसल्याने खरेदी जोरात सुरू आहे.
आकाश कंदील आणि पणत्यांना मागणी
प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आकाश कंदील आणि रस्त्यावर पणत्या विक्रीसाठी आले आहेत. विविध आकाराच्या पणत्यांना आणि आकाश कंदिलांना मागणी आहे. दरवाढ असली तरी दिवाळीपुढे ही दरवाढ नगण्य असल्याने खरेदी केली जात आहे.
बाजारात कर्मचारी, शेतकरी बेपत्ता
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारातील गर्दीत सर्वाधिक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय दिसत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना बोनस आणि वेतन मिळाले आहे. त्यामुळे कुटुंबासह मनसोक्त खरेदीचा आनंद लुटत आहे. परंतु या गर्दीत शेतकरी आणि शेतमजूर कुठेही दिसत नाही. अद्याप धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा आला नाही. काही शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकून दिवाळीसाठी तजवीज करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रविवारनंतर शेतकरी आणि शेतमजुरांची बाजारपेठेत गर्दी दिसणार आहे.