कालिदास महोत्सवात भंडाऱ्याच्या टसर सिल्कला ग्राहकांची पसंती

By admin | Published: November 28, 2015 01:42 AM2015-11-28T01:42:19+5:302015-11-28T01:44:11+5:30

नागपूर येथे कालिदास महोत्सवाच्या आयोजनासोबतच पूर्व विदर्भातील पर्यटन, संस्कृती व परंपरेची माहिती देणारे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

Consumers preferred Tiger Silk at the Kalidas Festival | कालिदास महोत्सवात भंडाऱ्याच्या टसर सिल्कला ग्राहकांची पसंती

कालिदास महोत्सवात भंडाऱ्याच्या टसर सिल्कला ग्राहकांची पसंती

Next

कपड्यांची प्रदर्शनी : मुख्यमंत्र्यांकडून महिलांचे कौतुक
भंडारा : नागपूर येथे कालिदास महोत्सवाच्या आयोजनासोबतच  पूर्व विदर्भातील पर्यटन, संस्कृती व परंपरेची माहिती देणारे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या प्रदशर्नात भंडारा जिल्ह्यातील टसर सिल्क  धाग्याची  आगळी-वेगळी ओळख निर्माण करणारे महिला बचत गटाचे दालन होते. यात महिलांनी उत्पादित केलेला कोसा कापड,  साड्या आणि कोष्यापासून निर्मित  इतर वस्तूंना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दालनाला भेट देऊन महिलांचे कौतुक केले.
भंडारा जिल्ह्यात टसर कोष उत्पादनाला पोषक वातावरण आहे. याचाच विचार करून माविमच्या महिला बचत गटाने जंगलात कोष उत्पादनासोबतच टसर धागा, कापड, साड्या निर्मिर्ती ते विविध नाविण्यपूर्ण  वस्तूंची निमिर्ती करण्यापर्यंत मजल मारली. या उद्योगात मोहाडी, पवनी, लाखांदूर व भंडारा तालुक्यातील सुमारे १५० महिलांचा   समावेश आहे.  महिला बचतगट निर्मित या वस्त्रांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध व्हाव, यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी प्रयत्न करुन या महोत्सवात महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.  
दरम्यान  कालिदास महोत्सवात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भंडाऱ्याच्या या दालनाला भेट देऊन महिलांनी उत्पादित वस्तुंची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना महिलांनी तयार केलेली फ्रेम भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी महिलांचे  अभिनंदन करुन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंबद्दल प्रशंसा केली.  यावेळी त्यांच्यासोबत चीनचे काउंसलेट जनरल चांग आणि ली, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव वत्सा नायर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
या महोत्सवात महिलांनी कलाकुसर केलेल्या उत्पादनांना  ग्राहकांची विशेष पसंती मिळाली.  यामध्ये साडी, शाल, उशांचे कव्हर, बेडशीट, ओढनी, स्टोल, ग्रीटिंग्ज, पंजाबी ड्रेस, स्कार्फ, फाइल अशा सर्वच वस्तुंची  सुमारे ५० हजार रूपयांची विक्री झाली झाली असून ५० हजार रुपयांची आॅर्डर महिलांना मिळाली आहे. 
प्रदर्शानाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय भूपृष्ठ  व नागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या दालनाला भेट देऊन महिलांचे कौतुक केले. भंडारासारख्या छोट्या जिल्ह्यातील महिला इतके सुंदर कापड व साड्यांची निर्मिती करीत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्यर्ही व्यक्त केले. या दालनात कोष  व कापड निर्मिर्तीचे प्रत्यक्षिकही ठेवण्यात आले  होते. येन वृक्षाची फांदी, टसर अळी, कोष, टसर फुलपाखरु, रिलिंग मशीन तसेच महिलांचे प्रत्यक्ष कशीदाकारीचे काम पर्यटकांना पहायला मिळत होते. यातून  ग्रहकांना  त्यांच्या निर्मितीविषयी सुद्धा माहिती मिळत होती. याशिवाय महिला हे काम कसे करतात याची चित्रफित पर्यटकांना दाखविण्यात आली. या दालनाला भेट देऊन चीनचे काउंसलेट यानी अर्धा तास ही सर्व प्रक्रिया समजून घेतली. महिलांच्या उत्पादनांना असे  व्यासपिठ उपलब्ध होऊन वस्तूंची विक्री झाल्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणीत होऊन त्या आणखी जोमाने काम करणार असल्याचे महिलांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Consumers preferred Tiger Silk at the Kalidas Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.