‘देशी कट्टा पाहिजे असल्यास संपर्क साधा’, फेसबुक अकाउंट हॅक करून खळबळजनक मेसेज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 11:22 AM2023-06-23T11:22:48+5:302023-06-23T11:24:22+5:30
हॅक केलेल्या फेसबुक अकाउंटवरील मेसेजने उडविली पोलिसांची झोप
अड्याळ (भंडारा) : येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष असलेले भूपेश मोडघरे यांच्या फेसबुक अकाउंटवर ‘देशी कट्टा पाहिजे असल्यास तत्काळ संपर्क साधा,’ असा मेसेज दिसला अन् पोलिसांची झोपच उडाली. पोलिसांनी तातडीने अकाउंटचा तांत्रिक शोध घेत अड्याळ गाठले. दारात पोलिसांचे सशस्त्र पथक पाहून मोडघरे यांनाही धक्का बसला. गावकरीही हादरून गेले. अखेर त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून ‘तो’ खळबळजनक मेसेज व्हायरल केल्याचे तपासात पुढे येताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.
‘तुम्हाला देशी कट्टा हवा आहे का, देशी कट्टा रिव्हॉल्व्हर कॉल करून मागवा!’ असा मेसेज भूपेश मोडघरे नावाच्या फेसबुक पेजवर आला. हा मेसेच सर्वत्र प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांपर्यंतही पोहोचला. या मेसेजमुळे पोलिस खडबडून जागे झाले. जिल्हा पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. गुन्हे शाखा विभागाने तातडीने सूत्रे हलविली. अड्याळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळ व जितेंद्र वैद्य यांनी तो मेसेज गावातीलच भूपेश मोडघरे यांच्या फेसबुकवरून आला असून, ते गावातच असल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलिस अधिकाऱ्यांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, असा प्रकार आपल्याला माहीतच नसल्याचे सांगून मोडघरे यांनी कानावर हात ठेवले. एवढेच नाही तर, मागील अनेक दिवसांत आपण फेसबुक अकाउंट उघडलेच नसल्याचे सांगून या प्रकाराबद्दल अनभिज्ञता दर्शविली.
अकाउंट राजस्थानातून ऑपरेट
यानंतर पोलिसांनी पुन्हा खोलवर तपास केला असता भूपेशचे फेसबुक अकाउंट राजस्थानमधून ऑपरेट केले जात असल्याची माहिती तांत्रिक तपासात समोर आली. अनेक दिवसांत स्वत:चे अकाउंट ऑपरेटच केले नसल्याने आपल्या अकाउंटवरून काय चालले आहे, याची भूपेश यांना कल्पनाच नव्हती.