कंटेनरची बैलगाडीला जबर धडक; कॅबिनमध्ये फसलेल्या शेतकऱ्याला ३० किमी दूर नेऊन फेकले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:58 PM2022-12-15T17:58:13+5:302022-12-15T18:01:53+5:30

मोहाडी तालुक्यातील सालईजवळ थरार; बैलबंडी चालक गंभीर, एक बैल ठार

Container hits bullock cart in mohadi tehsil; one bull killed and farmer seriously injured | कंटेनरची बैलगाडीला जबर धडक; कॅबिनमध्ये फसलेल्या शेतकऱ्याला ३० किमी दूर नेऊन फेकले रस्त्यावर

कंटेनरची बैलगाडीला जबर धडक; कॅबिनमध्ये फसलेल्या शेतकऱ्याला ३० किमी दूर नेऊन फेकले रस्त्यावर

Next

संजय मते 

आंधळगाव (भंडारा) : भरधाव कंटेनरने बैलगाडीला धडक दिली. या अपघातात बैलगाडी चालक शेतकरी हवेत फेकला जाऊन कंटेनरच्या कॅबिनमध्ये फसला. मात्र चालकाने कंटेनर न थांबविता पळून जात जखमी शेतकऱ्याला तब्बल ३० किमी अंतरावर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव येथे रस्त्याच्याकडेला फेकून दिले. सुदैवाने शेतकरी बचावला मात्र तो गंभीर जखमी झाला आणि एक बैलही या अपघातात ठार झाला. हा थरार राष्ट्रीय महामार्गावर मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.

साहेबराव शालिकराम ठाकरे (६०) रा. सालई खुर्द ता. मोहाडी असे जखमीचे नाव असून त्याच्यावर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरूवारी साहेबराव बैलगाडीने धान पोते घेऊन रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरून उसर्रा येथे भातगिरणीकडे जात होता. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरने बैलगाडीला घडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, बैलगाडी रस्त्याच्याकडेला फेकली गेली. तर बैलगाडी चालक साहेबराव हवेत फेकला जाऊन कंटेनरच्या कॅबिनमध्ये जाऊन फसला. चालकाने कंटेनर थांबवून जखमी शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी भरधाव वेगाने पळविला. साहेबराव जोरजोराने ओरडत असताना कंटेनर थांबविला नाही.

या प्रकाराची माहिती आंधळगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यांनी तत्काळ तुमसर आणि तिरोडा ठाण्यात माहिती दिली. गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळावर गर्दी केली. काही तरुणांनी या कंटेनरचा पाठलाग सुरू केला.मात्र कंटेनर भरधाव पळून गेला. अखेर गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा चौकीच्या पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलिस समोर पाहताच कंटेनर चालकाने शेतकरी साहेबराव यांनी नवेगाव येथे रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि कंटेनर तेथेच सोडून चालक पासर झाला.

जखमी साहेबराव यांना तात्काळ तुमसर येथील रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. या अपघाता एक बैल जागीच ठार झाला. अधिक तपास आंधळगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार करीत आहेत.

Web Title: Container hits bullock cart in mohadi tehsil; one bull killed and farmer seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.