नगरपरिषद अस्तित्वानंतरही होतोय दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: March 10, 2017 01:30 AM2017-03-10T01:30:34+5:302017-03-10T01:30:34+5:30
नाही म्हणता म्हणता साकोलीला नगरपरिषद अस्तित्वात आली. नगरपरिषद झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा नागरिकांना मिळाव्यात
सेंदुरवाफा येथे पाण्याची अपुरी व्यवस्था : साकोलीत फक्त एकाच वॉर्डात मिळतेय नळाचे पाणी
संजय साठवणे साकोली
नाही म्हणता म्हणता साकोलीला नगरपरिषद अस्तित्वात आली. नगरपरिषद झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा नागरिकांना मिळाव्यात त्या तर दुरच राहिल्या उलट या सुविधांवर साधी चर्चाही सुरू झालेली नाही. अशाच जिवंत समस्या ठरलेल्या साकोली व सेंदुरवाफा वासीयांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. कारण दोन्ही गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी एकमेव योजना पांढरा हत्ती ठरली आहे.
साकोली व लाखनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून १९ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना तयार केली. सदर योजना तयार होऊन जवळपास दहा वर्षाचा कालावधी लोटला. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुटप्पी धोरणामुळे ही योजना निकामी झाली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे साकोली तालुक्यात साकोली, जांभळी, शिवणीबांध, खंडाळा, सावरबंध, पिंडकेपार, बोदरा, सेंदुरवाफा तर लाखनी तालुक्यातील पोहरा, लाखोरी, पिंपळगाव, मानेगाव, पेंढरी, सोनेगाव, सावरी, सोमलवाडा, गोंडसावरी व रेंगेपार कोठा अशा दोन्ही तालुका मिळून १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी ही योजना अस्तित्वात आली.
ही योजना तयार होवून दहा वर्षाचा कालावधी लोटला. मात्र योजनेचा लाभ नागरिकांना होवू शकलेला नाही. या योजनेसाठी गडकुंभली टेकडीजवळ उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे शुद्ध पाणी नागझिरा रोड साकोली येथील पाण्याच्या टाकीत सोडून या टाकीतून १९ जणांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार होता.
यासाठी साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावासह १९ गावातही पाईपलाईनचे काम पुर्णत्वास नेण्यात आले. पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद प्रशासन आपल्याकडे घेण्यास तयार नसल्यामुळे हस्तांतरणाअभावी ही योजना तशीच निकामी ठरली आहे.
यापूर्वी साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होत होता. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले व पाईपलाईन निकामी झाली तेव्हापासून सेंदुरवाफा येथे नळाचे पाणी बंद आहे.
दुसरीकडे साकोली येथेही फक्त एकाच वॉर्डात नळाचे पाणी मिळते उर्वरित वॉर्डात विहिरी किंवा बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.