नद्यांच्या काठावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:56+5:302021-02-06T05:05:56+5:30

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या ...

Contaminated water supply to riverside villages | नद्यांच्या काठावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा

नद्यांच्या काठावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा

Next

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेला जलशुद्धीकरण केंद्राची सोय नसल्याने नदी पात्रातून थेट उपसा करण्यात आलेले पाणी नागरिकांना उपलब्ध केले जात आहे. लालसर आणि गढूळ पाणी असल्याने नागरिक पिण्यासाठी याचा उपयोग करीत नाहीत. या पाण्याचा वापर आंघोळीसाठी करण्यात येत आहे. नद्यांच्या काठावरील गावे असताना शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे अनेक कुटुंब गढूळ व लालसर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत. वैनगंगा नदीवर कवलेवाडा गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आल्याने गढूळ व दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. दरम्यान, नदीच्या काठावरील गावातील नळ योजनांना मिनी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आले नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट या गावात निर्माण होत आहे. चुल्हाड, सुकळी नकुल, देवरी देव, गोंडीटोला, बपेरा गावात ही समस्या वाढत आहे. या गावात गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु कधी या पाण्याची चौकशी करण्यात येत नाही. याच गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. अडीच लाख लीटर पाणी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना भंगारात निघाली आहे. या योजनेचे संचालन योग्य रितीने करण्यात आले नाही. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करताना यंत्रणा गंभीर झाली नाही. धरणातील पाणी नियमित विसर्ग होत नसल्याने क्षारयुक्त पाणीच नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात नागरिकांची स्थिती सधन नसल्याने फिल्टर घरी कुणी लावत नाही. यामुळे गावकरी चिंतेत आहेत. गावांत पिण्याच्या पाण्याचे संकट नसल्याची नोंद शासकीय दस्तऐवजमध्ये आहे. परंतु नळयोजनेअंतर्गत उपलब्ध होणारे पाणी प्रत्यक्षात कुणीही पिण्यासाठी वापरत नाहीत. गावातील बोअरवेल्स बंद होताच गावकरी बोंबाबोंब ठोकत आहेत. गोंडीटोला गावात सौरऊर्जेवरील पंपगृह मंजूर करण्यात आले नाहीत. या गावातील निम्म्याहून अधिक नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळत नाही. जिल्हा परिषदमध्ये पाणी पुरवठा विभागात नियोजन करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थ शासनाच्या योजनांपासून वंचित राहात आहेत.

काविळच्या रुग्णांची आयुर्वेदिक उपचाराकडे धाव

गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नद्यांच्या काठावरील गावांत काविळच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. या आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत. गावात प्राप्त होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारासाठी धाव घेत आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना या आजाराचा गावात प्रसार झाला असल्याची पुसटही कल्पना येत नाही. आयुर्वेदिक औषध उपचाराने काविळ आजार बरा होतो, असा आत्मविश्वास नागरिकांत आहे. यामुळे शासन स्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

गोंडीटोला गावात नळ योजनेने नागरिकांना पाणी पुरवठा होत असले तरी वाॅर्ड क्रमांक २ आणि ३ मध्ये योजनेचे पाणी पोहोचत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत सौरऊर्जेवरील नळ योजना मंजूर करण्याची गरज असून, नद्यांच्या काठावरील गावांत मिनी जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता आहे.

शीतल चिंचखेडे, वैशाली पटले, सदस्या, ग्रामपंचायत, गोंडीटोला

Web Title: Contaminated water supply to riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.