नद्या काठावरील गावात दूषित पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:07+5:302021-06-16T04:47:07+5:30
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावात दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत ...
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावात दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांवर जलजन्य आजाराचे संकट ओढवले आहे. गावात आजाराची साथ येण्याची शक्यता आहे. नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. गावात कावीळचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने गावठी उपचारासाठी नागरिक धाव घेत आहेत. यात प्रशासन बेखबर असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावानंतर नागरिक बाहेर पडत असताना नव्या संसर्ग जलजन्य आजाराच्या गर्तेचे संकट प्रतीक्षा करीत आहे.
सिहोरा परिसरातून वैनगंगा, बावणथडी नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत. या नळयोजनांना जलशुद्धीकरणाची सोय नसल्याने गढूळ व दूषित पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. पावसाळ्याचे पाहिले पाणी नदी पात्रात पोहोचले असून पाणी गढूळ झाले आहे. गढूळ व दूषित पाणी नागरिकांना नळ योजनेने उपलब्ध केले जात आहेत. ग्रामपंचायतीने पाण्याचे टाकीत ब्लिचिंग पावडरचे मिश्रण करीत असले तरी जलशुद्धीकरण होत नाही. पाण्याचा लाल व पिवळसर रंग बदलत नाही. या दूषित व गढूळ पाण्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
लहान बालकांतील कावीळचे वाढते प्रमाण असल्याने पालकांच्या मनात रोष आहे. गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी अद्याप पुढाकार घेतला नाही. नळ योजना असणाऱ्या गावांत नागरिक हातपंपाच्या पाण्यावर तहान भागविण्यासाठी धाव घेत आहेत. सुकली नकुल, सिहोरा, येरली अशा तीन योजना परिसरात आहेत. परंतु यात सिहोरा गावातील योजना वगळता दोन्ही योजना आटल्या आहेत. दोन्ही योजना भंगारात निघाल्या आहेत. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे बाबतीत शासनाची उदासीनता नागरिकांचे जिवावर बेतणारी ठरत आहे. परंतु कुणी गंभीर होताना दिसत नाही.
बॉक्स
सुकली प्रादेशिक योजना सुरु करा
बपेरा गावांचे हद्दीत असणाऱ्या सुकली नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला संजीवनी देण्याची ओरड नागरिक करीत आहेत. बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना ही योजना पाणीपुरवठा करीत आहे. परंतु या योजनेला गुंडाळण्यात आल्याने शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित झाले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने या योजनेचे पाणीपुरवठा करण्याची मागणी युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे विनोद पटले, सरपंच वैशाली पटले, ग्रामपंचायत सदस्या शीतल चिंचखेडे, सरपंच पारस भुसारी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र बघेले, सामाजिक कार्यकर्ते यादोराव बोरकर, सरपंच ममता राऊत, माजी सरपंच हरिकिशन बनकर यांनी केली आहे.