दिव्यांग शाळा शिक्षकांचे लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत वेतन सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:15+5:302021-06-03T04:25:15+5:30
राज्यातील दिव्यांग कल्याण विभाग, तसेच समाजकल्याण विभागअंतर्गत जिल्हानिहाय अंध, अपंग शाळा, मूकबधिर, कर्णबधिर निवासी शाळा, मतिमंद शाळा, औद्योगिक निवासी ...
राज्यातील दिव्यांग कल्याण विभाग, तसेच समाजकल्याण विभागअंतर्गत जिल्हानिहाय अंध, अपंग शाळा, मूकबधिर, कर्णबधिर निवासी शाळा, मतिमंद शाळा, औद्योगिक निवासी कार्यशाळा आदी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निवासी शाळा असून यात हजारोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याकरिता ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक मागील तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित असल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिव्यांग शाळांची अनुज्ञप्ती व नूतनीकरण ३१ मार्च रोजी करणे अनिवार्य असते. त्यामुळे ज्या शाळांची नूतनीकरणाची मुदत संपली त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट पाहता सर्व शाळांचे प्रस्ताव शासनदरबारी अडले आहेत. त्यामुळे केवळ शाळांचे नूतनीकरण झाले नसल्याचे कारण पुढे करून राज्यातील सर्व दिव्यांग शाळा शिक्षकांचे मार्चपासूनचे वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
त्यानुसार मे रोजी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांगांच्या अनुदानित शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृह यांची नोंदणी प्रमाणपत्राची वैधता मार्च २१ मध्ये संपुष्टात आली आहे व अधिनियमातील तरतुदीनुसार विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. अशा दिव्यांगांच्या अनुदानित शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहातील शासनाने निश्चित केलेल्या विहित प्रक्रियेनुसार नियुक्त व प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या व आर. सी. आय. प्रमाणपत्र वैधताधारक कर्मचाऱ्यांचे वेतन माहे मार्च २१ पासून ते लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत सुरू ठेवण्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना आदेश दिले.
त्यामुळे राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षकांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला असून दिव्यांग आयुक्तांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, राजेश हाडके, विलास खोब्रागडे, उमेश वारजुरकर, तेजराम राजूरकर, दारासिंग चव्हाण, मालूताई क्षीरसागर, गिरीश वऱ्हाडपांडे, अशोक दांडेकर, त्र्यंबक मोकासरे, रत्नाकर शहारे, शिवशंकर ठाकरे व रवींद्र जेनेकर आदींनी आभार व्यक्त केले आहे.
बॉक्स
भंडारा जिल्ह्यातील वेतन नसलेल्या शाळा
स्वावलंबी अपंग औद्योगिक निवासी कर्मशाळा, साकोली, ज्योतिबा फुले अपंग औद्योगिक निवासी कर्मशाळा, भंडारा, जनचेतना कर्णबधिर निवासी विद्यालय, भंडारा, ज्ञानगंगा मतिमंद मुलांची शाळा, दुर्गानगर तुमसर, अपंग प्रशिक्षण केंद्र, तुमसर, अपंग निवासी निवासी विद्यालय विवेकानंदनगर, तुमसर.
जानकी माधव डुंभरे मूकबधिर विद्यालय शिवनगर, तुमसर. राजे छत्रपती निवासी मूकबधिर, भिलेवाडा.
जनचेतना मतिमंद निवासी शाळा, बेला, भंडारा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मतिमंद शाळा शुक्रवारी भंडारा, आदी शाळांचा समावेश आहे.