यशासाठी सतत चिकाटी आवश्यक
By admin | Published: February 12, 2017 12:23 AM2017-02-12T00:23:29+5:302017-02-12T00:23:29+5:30
जीवनात ध्येय ठरविताना आवड कशात आहे, त्यानुसार मार्ग निवडावा. त्यानुसार मेहनत, चिकाटी यातूनच यशसंपादन करता येते.
देवसुदन धारगावे : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जे. एम. पटेल महाविद्यालयात आयोजन
भंडारा : जीवनात ध्येय ठरविताना आवड कशात आहे, त्यानुसार मार्ग निवडावा. त्यानुसार मेहनत, चिकाटी यातूनच यशसंपादन करता येते. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो मेहनतीशिवाय आपल्याला यश प्राप्त करता येत नाही. ध्येय संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. घोकंपट्टीने ध्येय संपादन करता येत नाही. जीवनात अपयश आले तरी घाबरुन जायचे नसते तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभाग गोंदियाचे सहाय्यक उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी व्यक्त केले.
जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथील वाणिज्य विभाग व वाणिज्य अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने युपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धात्मक परीक्षेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे हे होते. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राहुल मानकर तसेच प्रा.शैलेश वसानी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राहुल मानकर यांनी केले. ते म्हणाले, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. भविष्यकाळात स्पर्धा परीक्षेशिवाय कोणतीही नोकरी हस्तगत करता येणार नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पूर्ण चिकाटीने आणि चौकस पद्धतीने करायला हवा. त्यातूनच यशाची प्राप्ती मिळते. प्राचार्य डॉ.विकास ढोमणे म्हणाले, मेहनत करण्यासाठी कुठलीही मर्यादा नसते, आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरीच्या माध्यमातून सन्मानाने जीवन प्राप्त करता येते. त्यासाठी स्पर्धा परीक्षा हा सोपा मार्ग आहे. तसेच नोकरी व्यतिरिक्त स्वयंरोजगार या माध्यमातून ही आपण दुसऱ्याला रोजगाराची संधी देवू शकतो. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. यामुळे वेळेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावे आणि त्यातूनच जीवनात यश संपादन करावे. पाहुण्यांचा परिचय प्रा. माधवी मंदुरकर यांनी केले. तर संचालन प्रा.प्रशांत वाल्देव यांनी केले. आभार प्रा.प्रशांत गायधने यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. आनंद मुळे, प्रा. धनराज घुबडे, प्रा.नंदिनी मेंढे, प्रा.सोनू शर्मा, प्रा.प्रशांत निमजे, प्रा.भाग्यश्री शेंडे तसेच मनोहर पोटफोडे, विनोद नक्क्षुलवार तसेच रॉबीन सोनटक्के, दिनेश बोकडे, हेमंत सोनकुसरे, गगन बिसेन आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)