मोक्याच्या जागेवर कंत्राटदारांची नजर !
By admin | Published: December 27, 2014 10:44 PM2014-12-27T22:44:31+5:302014-12-27T22:44:31+5:30
नगर पालिका शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे पालिकेच्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हे हेरुन शहरातील काही कंत्राटदारांनी या बंद शाळांकडे आपली नजर वळविली आहे.
भंडारा : नगर पालिका शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे पालिकेच्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हे हेरुन शहरातील काही कंत्राटदारांनी या बंद शाळांकडे आपली नजर वळविली आहे. पालिकेकडून बीओटी तत्वावर शाळा घ्यायच्या आणि तिथे व्यापारी संकुल बनवून पैसा लाटायचा असा हा प्रकार आहे.
काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी नेहरु प्राथमिक विद्यालय होते. आता या ठिकाणी टोलेजंग जे.के. प्लाझा हे व्यापारी संकुल बनले आहे. आता त्याच प्रकारे रिकाम्या जागांचा काही कंत्राटदारांकडून शोध घेणे सुरू आहे. पालिका पदाधिकाऱ्यांना हाताशी घेऊन व्यापारी संकुल होणार आहे.
लाल बहाद्दूर प्राथमिक शाळा
खांब तलाव ते शास्त्री चौक या मार्गावर लाल बहाद्दूर प्राथमिक शाळा आहे. या शाळेची ईमारत अगदी मोक्याच्या जागेवर आहे. शीट नंबर ५ मध्ये प्लॉट क्रमांक १०/३ मध्ये १,४२६ चौरस मीटर म्हणजे १५,३४९ चौरस फूट जागेत ही ईमारत आहे. या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे ही शाळा बंद झाली आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या काही कंत्राटदारांची मागील अनेक दिवसांपासून या ईमारतीवर नजर आहे. त्यांना या जागेवर व्यापारी संकुल बांधावयाचे आहे.
नरकेसरी (बुटी) शाळा
स्टेट बँक आॅफ इंडियाला लागून पालिकेची नरकेसरी प्राथमिक शाळा आहे. शीट नंबर ९ प्लॉट क्रमांक १५८ मध्ये १,५४८ चौरस मीटर म्हणजे १६,६६३ चौरस फूट जागेत ही ईमारत आहे. या बंद शाळेच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी अनेक कंत्राटदार ईच्छूक आहेत.
गोखले बालोद्यान
खांब तलाव चौकात गोखले बालोद्यान आहे. शीट नंबर २४, प्लॉट क्रमांक ३ मध्ये ३,६२७ चौरस मीटर म्हणजे ३९,१४० चौरस फूट जागेत गोखले बालोद्यानाची जागा आहे. खरेतर शहरात आजघडीला एकही बालोद्यान नाही. त्यामुळे व्यापारी संकुलापेक्षा काही क्षणाच्या विसाव्यासाठी बालोद्यानाची गरज आहे. परंतु आहे ते बालोद्यानावर व्यापारी संकुलाचा घाट बांधल्या जात आहे. या बालोद्यान परिसरातील एका कंत्राटदाराने ही जागा आपल्याला मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोंडवाड्याच्या जागेवरही लक्ष
रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे शहरातील रस्ते जनावरांसाठी तर नाहीत ना? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. एकीकडे कोंडवाडा रिकामा आणि दुसरीकडे जनावरे रस्त्यावर असा विरोधाभास शहरात बघायला मिळत आहे. यापूर्वी सराई नाका येथे असलेला कोंडवाडा आॅगस्ट २०११ मध्ये जिल्हा क्रीडा संकुलासमोरील शासकीय जागेत सुरू करण्यात आला आहे. या जागेवरही व्यापारी संकुल उभारण्यासाठी कंत्राटदारांनी पालिकेसमोर प्रस्ताव सादर केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
लोकहो, एवढे मूकदर्शक बनलात कसे?
छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कायद्याची भाषा सांगून लढणारे आपण संवेदनशील नागरिक या शहरातील गैरप्रकाराविरुद्ध कधीतरी आवाज उचलणार की नाही? आपणही या शहराचे घटक आहोत. ही जाणीव आपल्याला होणार की नाही? मते देऊन सामान्य माणसांना ‘नगरसेवक’ हे बिरूद चिकटविण्याचे काम आपणच केले. मग त्यांना शहरातील समस्येबाबत अवगत करण्याचे अधिकार आपणाला नाहीत का? उन्हाळ्यात पिवळसर पाणी पिऊनही गप्प राहिलात. पावसाळ्यात घराशेजारी गटारगंगा वाहतानाही मुके राहिलात. आता पालिकेच्या शाळा, बालोद्यानाचा विकास करण्याऐवजी व्यापारी संकुल उभारुन धनदांडग्याचे पोट भरण्यात येणार आहेत. आणखी किती दिवस तुम्ही मूकदर्शक बनून बघ्याची भूमिका घेणार आहात. आतातरी ‘हे शहर माझे आहे’, ही भावना मनात रुजवा नाहीतर उद्या तुमच्या श्वासावरही हे कंत्राटदार ‘हावी’ होतील.