रेतीमाफियांच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:27+5:30
तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळे ते मुजोर होवून दिवसा व रात्री बिनधास्तपणे रेती चोरुन नेत असल्याने शासकीय यंत्रणा त्रस्त झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असून रेती माफिया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता गब्बर झाले आहेत. त्यातच अवैध दारू विक्रेत्यांचेही मनसुबे बळावले आहेत. डुग्गीपार पोलिसांनी अवैध रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या असून ३ रेतीमाफीया व २ दारूविक्रेत्यांना तडीपार करण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.
तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळे ते मुजोर होवून दिवसा व रात्री बिनधास्तपणे रेती चोरुन नेत असल्याने शासकीय यंत्रणा त्रस्त झाली होती. रेतीमाफीयांचे एकमेकांशी कनेक्शन पाहता पोलीस किंवा महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यावर वॉच ठेवून त्वरीत एकमेकांना माहिती पुरवून ते गायब होत होते. त्यामुळे लोकांचा महसूल विभाग व पोलीस विभागावरचा विश्वास डळमळीत झालेला होता.
डुग्गीपारचे ठाणेदार विजय पवार यांनी मात्र सर्व रेतीमाफीयांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कुंडली काढून त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती घेत वर्गीकरण केले. त्यानुसार चालू वर्षात वाळूचोरीचे २३ गुन्हे दाखल झाल्यावर रेती चोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला २ पेक्षा जास्त रेती चोरीच्या गुन्हेगारांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाया केल्या.सदर कारवाई होऊनही ज्या रेतीमाफीयांनी आपला अवैध धंदा सुरुच ठेवला अशा ३ रेतीमाफीयांवर शासनाच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे व सार्वजनिक शांतता कायम राहावी म्हणून तडीपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले असून ते धास्तावलेले आहेत.
तसेच अवैधरित्या देशी व विदेशी दारु विक्री करणाºयांमुळे सामाजिक वातावरण दूषित होवून सार्वजनिक शांतता भंग होत आहे. यामुळे जनसामान्यांना विनाकारण त्रास सोसावा लागत असल्यामुळे त्यांच्यावरही कठोर प्रतिबंध व्हावा म्हणून २ अवैधरित्या दारु विकणाºया इसमांविरुद्ध सुद्धा तडीपारचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या या ५ तडिपार कारवाईमुळे वाळूमाफीया व अवैधरित्या दारु विक्रेत्यांचा प्रतिबंध होईल. मात्र पोलिसांनी या कारवाईत सातत्याने ठेवण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहे.