भिसी गुंतवणूकदारांवर संक्रांत
By admin | Published: November 29, 2015 01:32 AM2015-11-29T01:32:20+5:302015-11-29T01:32:20+5:30
शहरात भिसीचा व्यवसाय तेजीत सुरू असून काही व्यावसायिकांनी अनेकांकडून लाखो रूपये घेऊन सर्वांच्या भीसी बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तुमसरातील प्रकार : भिसी जमा करणारे शहरातून पसार, गुंतवणूकदार चिंतेत
तुमसर : शहरात भिसीचा व्यवसाय तेजीत सुरू असून काही व्यावसायिकांनी अनेकांकडून लाखो रूपये घेऊन सर्वांच्या भीसी बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील मुख्य सुत्रधार शहर सोडून पसार झाला आहे. यामुळे शहरातील भागधारकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा भडका कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता बळावली आहे.
तुमसर हे शहर व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. अनेक वर्षापासून येथे भिसीचा व्यवसाय केला जातो. यात अनेक व्यापारी व सामान्य नागरिक गुुंतले असून त्यांनी गुंतवणूक केली होती.
काहींनी १० लाख तर काहींनी ५ लाखांची म्हणजे दोन लाखांपासून २० ते २५ लाखापर्यंत ही गुंतवणूक केली. अनेकांनी भिसीचे हप्ते भरले. अनेकांना त्यांचा लाभ झाला, परंतु मागील एका महिन्यापासून शहरातील भीसी सुरू करणारे चिंतेत आहेत. कारण भिसी मालकाने हात वर केले. काही भिसी मालक शहर सोडून गेले त्यामुळे तणावाची स्थिती आहे.
व्यावसायिकांना नगदी रकमेची गरज पडते म्हणून व्यावसायिक महिन्याला सुलभ हप्ते भरतात. त्यात ज्यांना गरज आहे ते या रकमेची बोली बोलून कमी खर्चात ती घेतो यामुळे अनेक व्यावसायिकांना वेळेवर रकमा मिळून जातात.
यामुळे अनेकांनी यात गुंतवणूक केली, परंतु मागील एक महिन्यापासून शहरातील भिसी उघडणारे ओरडत आहेत. यात तीन भिसी मालकांनी हात वर केल्याचे समजते. यात लाखोंची अफरातफर झाल्याचे बोलले जात आहे. काही शहर सोडून गेले तर गुंतवणूकदार मुळ रक्कम मागण्यास गेल्यावर रक्कम देण्यास नकार दिला. काहींनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.
या सर्व प्रकरणात काय करावे या विवंचनेत हे गुंतवणुकदार आहेत. भिसी सुरू करण्यासंदर्भात शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. सरकारचा येथे हस्तक्षेप नसल्याने कुणाकडे जावे, असा सूर सध्या भिसी गुंतवणूकदार करीत आहेत. आर्थिक मोह येथे गुंतवणुकदारांना नक्कीच भोवला, असे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)