विहिरी, तलाव व बोड्यांमध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:53 AM2018-05-11T00:53:06+5:302018-05-11T00:53:06+5:30
करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी २० फुटाने खाली गेल्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे.
गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी जलयुक्त शिवार योजनेत सात गावांचा समावेश आहे. मात्र, तलाव खोलीकरणासाठी मिळणारा निधी तीन ते सहा लाख रुपयांचा असल्याने खोलीकरणाचे नावावर दिशाभूल केली जात असल्याची ओरड आहे.
करडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्य व वैनगंगा नदीच्या मध्यभागी वसलेला आहे. वनांनी समृध्द परिसरात तलावांची संख्याही मोठी आहे. मात्र, तलावांच्या अस्तित्वात प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवला आहे. निव्वळ पाण्याचीच नव्हे तर वापराच्या पाण्यासाठी सुध्दा समस्या आहे. करडी परिसरात मोजून लहान मोठे तलाव व बोड्यांची संख्या २८ आहे. परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा बुज, निलज खुर्द, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार, करडी, जांभोरा, किसनपूर, लेंडेझरी, केसलवाडा, खडकी पालोरा, बोंडे, मुंढरी बुज, मुंढरी खुर्द, कान्हाळगाव, बोरगाव, ढिवरवाडा आदी गावात ही तलाव आहेत.
कधी न आटणारे ढिवरवाडा, केसलवाडा, जांभोरा, किसनपूर येथील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. लहान तलाव व बोड्या पाण्याविणा कोरडे पडले आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. अतिक्रमण शेतकऱ्यांनीच केल्याने तलवांचे रुपांतर बोड्यात झाले आहेत. बोड्या नामशेष होण्याच्या मार्गात आहेत.
खोलीकरणासाठी मिळणारा निधी अपुरा
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये परिसरातील चार गावे जलयुक्त शिवार योजनेत करडी, मोहगाव, देव्हाडा, बोरी-पांजरा गावांचा समावेश करण्यात आला. करडी गावातील गणपती तलावाला दोन टप्प्यात सुमारे ४० लाखांचा निधी दिला गेला. त्यामुळे तलावाचे योग्य खोलीकरण होवून एक ‘मॉडेल’ तलाव तयार झाले. फक्त गणपती तलाव वगळता सर्वत्र पाण्याचा दुष्काळ आहे. सन २०१७-१८ मध्ये परिसरातील पालोरा, खडकी बोंडे, डोंगरदेव, नवेगाव, जांभळपाणी आदी गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना खोलीकरणासाठी मिळालेला निधी ३ ते ६ लाखांचा असल्याने कामे पूर्णत: होत नसल्याची ओरड आहे.
अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकाराची गरज
जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेल्या मामा तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. अतिक्रमणामुळे तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. तलावात शेती तयार करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. तलावांची मोजणी करण्याची व अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत असतांना जिल्हा परिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.