प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:31 AM2021-04-05T04:31:10+5:302021-04-05T04:31:10+5:30
भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण ...
भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण आढळत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची संकेत देणारी आहेत. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या परीने सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी नागरिकांनीही आपले कर्तव्य ओळखून प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्ष व खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. रविवारी आयोिजत पत्रकार परीषदेत ते बोलत होते. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आणि नियमांचे पालन करणे हेच उपाय प्रभावी ठरू शकतात, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास फडके उपस्थित होते.
सध्याच्या घडीला विदर्भात नागपूर नंतर भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्ण संख्या ही विक्रमी वाढली आहे. आठशेचा आकडा पार केल्याने आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच रुग्ण संख्या रोज वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन त्याचे विपरीत परिणाम रुग्णांना भोगावे लागू शकतात. वाढती रुग्ण संख्या ही ‘कम्युनिटी स्प्रेड’ चे संकेत असू शकतात. त्यामुळे आता प्रत्येकाला काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाला सहकार्य करण्याची वेळ आली आहे.
ही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास एका ठिकाणी प्रशासनही हतबल होण्याची शक्यता आहे. ही वेळ येऊ नये म्हणून आत्ताच नागरिकांनी सावध व्हावे. अनावश्यक आणि महत्त्वाची कामे नसतील तर घराबाहेर पडू नये. पान टपरी, चहाची दुकाने अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून कोरोना घरोघरी पोहोचण्याची शक्यता आहे.
बॉक्स
लसीकरण महत्वाचे
एकीकडे काळजी घेताना दुसरीकडे लसीकरण सुद्धा महत्त्वाचे आहे. वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या सर्वांनी लस टोचून घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून खाजगी रुग्णालयात पर्यंत सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र शासनाने सुरू केली आहेत. मनात कोणतीही भीती न ठेवता. लस टोचून घेणे या संसर्गाची लढण्यासाठी स्वतःला तयार करावे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे. लसीकरण केंद्रावर यंत्र कसे जाता येईल, याची व्यवस्था लावून देत जास्तीत जास्त लसीकरण होईल असा प्रयत्न करावा, असेही खा.मेंढे म्हणाले.
बॉक्स
पात्र व्यक्तींनी रक्तदान करावे
तसेच दुसऱ्या लसिकरनानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नसल्याने व सध्या उन्हाळा ऋतू सुरु असल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खा.सुनील मेंढे यांनी युवा वर्ग व पात्र व्यक्तींनी स्वइच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन सुद्धा याप्रसंगी केले.