धडक सिंचन विहिरींसाठी ‘कोअर कमिटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:03 AM2017-10-05T00:03:49+5:302017-10-05T00:05:11+5:30
धडक सिंचन विहिरींचे बांधकाम झाल्यानंतर त्याचा धनादेश मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना सुमारे महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागत होता.
प्रशांत देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धडक सिंचन विहिरींचे बांधकाम झाल्यानंतर त्याचा धनादेश मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना सुमारे महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागत होता. हा कालावधी कमी करून लाभार्थ्यांना आठ दिवसात बांधकामाचे धनादेश देता यावा यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या भंडारा उपविभागाने ‘कोअर कमिटी’ स्थापन केली आहे. यातून लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर आठ दिवसात रक्कम मिळणार आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील भंडारा उपविभागात उपविभागीय अभियंता ए.आर. डाखोरे यांनी ही संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ व्हावा यादृष्टीने कर्मचाºयांची कोअर कमिटी स्थापन केली आहे. या कोअर कमिटीचे प्रमुख म्हणून कनिष्ठ सहायक केसरीलाल गायधने यांची नियुक्ती केली आहे. या कमिटीमध्ये उपविभागातील नऊ कंत्राटी अभियंता, चार स्थायी अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यांतर्गत भंडारा उपविभागाचे कार्यक्षेत्र आहे. येथील धडक सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांना एका विहिरीच्या बांधकामाकरिता दोन लाख ५० हजार रूपयांचे अर्थसहाय पुरवठा केल्या जातो. भंडारा जिल्ह्याला एक हजार विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापैकी ५२४ विहिरींचे काम करण्यात येत आहे. त्यापैकी १६० विहिरींचे काम पूर्ण झालेले आहे. अनेक विहिरींचे कामे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले आहेत. ज्या विहिरींचे कामे पूर्ण झाली त्यांना मोबदला मिळविण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये, यासाठी उपविभागीय अभियंता ए.आर. डाकोरे यांनी ही नवसंकल्पना राबविली आहे. या अनुषंगाने बांधकामाची पाहणी सदर कोअर कमिटी बघणार असून त्यानंतर सर्व कागदपत्रांची सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आरटीजीएसने लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम वळती केल्या जाणार आहे. यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची होणारी फरपट थांबण्याचा विश्वास ए. आर. डाखोरे यांनी व्यक्त केला आहे.
लाभार्थ्यांची होणारी आर्थिक कुचंबना थांबविण्यासाठी जीपीएस व आरटीजीएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. आठ दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर विहिरींची रक्कम वळती करण्यात येईल. कोअर कमिटीला याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
-ए.आर. डाखोरे,
उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग, भंडारा.
१६० विहिरींची कामे पूर्ण
भंडारा उपविभागाला यावर्षात ५२४ विहिरींचे बांधकाम करावयाचे आहे. त्यात भंडारा तालुक्यात १९०, मोहाडी तालुक्यात १५६ तर तुमसर तालुक्यात १७८ विहिरी मंजुर झाल्या आहेत. त्यापैकी भंडारा तालुक्यात ४६, मोहाडी तालुक्यात ५६ व तुमसर तालुक्यात ५८ अशा १६० विहिरी पूर्ण झालेल्या आहेत. ५२४ पैकी ४५२ विहिरींची कामे सुरू असून १६० पुर्णत्वास आली आहे.
जीपीएस प्रणालीचा वापर
विहिरींचे बांधकाम असलेल्या शेतातील विहिरींची माहिती अद्यावत ठेवण्याकरिता लघु पाटबंधारे विभागाने जीपीएस प्रणालीचा वापर केला आहे. या माध्यमातून विहिरींचे बांधकाम व परिसराची तांत्रिकदृष्ट्या सखोल माहिती संग्रहित राहणार आहे. या माहितीच्या आधारे लाभार्थी व त्याच्या विहिरीची माहिती पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्याला मोबदला मिळणार आहे. ही सर्व माहिती राज्य शासनाच्या सरकार पोर्टलवर प्रसारित करण्यात येत आहे.