कोरोनाचे 15 दिवसांत 598 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:00 AM2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:48+5:30
कोरोनाची तिसरी लाट राज्यात आल्यानंतर, भंडारा जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढायला लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र, नवीन वर्षाला प्रारंभ होताच हळुहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. तर, दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाची तिसरी लाट जिल्ह्यात आली असून, अवघ्या पंधरा दिवसांत ५९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यातही दुसऱ्या आठवड्यात रुग्णांचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी तर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला. आरोग्य यंत्रणा सतर्क असली, तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाची तिसरी लाट राज्यात आल्यानंतर, भंडारा जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढायला लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र, नवीन वर्षाला प्रारंभ होताच हळुहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. तर, दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.
१ ते १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ५९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी १९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या ४०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. मात्र, नागरिक आजही नियमांचा फज्जा उडवित असल्याचे चित्र आहे.
१० वर्षाआतील २१ बालके बाधित
- कोरोना संक्रमण वाढत असून मुलांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ० ते १० वयोगटातील २१ बालकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यात ११ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. तर, ११ ते २० वयोगटातील ८४ मुलांचा समावेश आहे. त्यात ४३ मुले आणि ४१ मुली आहेत.
सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० वयोगटातील
- दुसऱ्या लाटेप्रमाणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० वयोगटातील आहेत. २१ ते ३० या वयोगटात १६६ तर ३१ ते ४० या वयोगटात १२० असे २८६ रुग्ण या वयोगटात आहेत. विशेष म्हणजे ७१ ते ८० आणि ८० वरील वयोगटात केवळ १० रुग्ण आहेत. नियमांचे उल्लंघन करीत असल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे.
जिल्ह्यात ४०८ ॲक्टिव्ह रुग्ण
- भंडारा जिल्ह्यात ४०८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, सर्वाधिक भंडारा तालुक्यात १८२ रुग्ण आहेत. त्याखालोखाल तुमसर ७८, लाखनी ५६, साकोली ३१, लाखांदूर २५ आणि मोहाडीत २३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेत कुणाचा मृत्यू झाला नाही. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
शनिवारी ८१ पॉझिटिव्ह
- शुक्रवारी ९८९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ८१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. भंडारा तालुक्यात ३२, मोहाडी पाच, तुमसर २७, पवनी तीन, लाखनी चार, साकोली नऊ आणि लाखांदूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ६० हजार ७०९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून, ५९ हजार १६७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.