कोरोनामुळे लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:54+5:302021-09-02T05:15:54+5:30
भंडारा : मे महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना कमी झाल्यानंतर कोरोनापूर्वी अनेकांचे थांबलेले लग्नसोहळे उरकण्यासाठी एकच लगबग दिसून येत आहे. ...
भंडारा : मे महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना कमी झाल्यानंतर कोरोनापूर्वी अनेकांचे थांबलेले लग्नसोहळे उरकण्यासाठी एकच लगबग दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून माणसाचे जीवनच बदलून गेले आहे. कोराेनाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लग्नावर होणारा खर्चाची उधळण मात्र आता लग्नात फारशी होताना दिसून येत नाही. अनेकजण आपल्या घरासमोरच साध्या पद्धतीने लग्नसोहळे आटोपत आहेत. यामुळे वधू-वरांसह घरातील इतर मंडळीही विनाकारण खर्चाला फाटा देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र असे असले तरीही दुसरीकडे मात्र अनेकजण व्यवसायापेक्षा सरकारी नोकरी असणाऱ्या तरुणांनाच प्राधान्य देताना दिसून येत आहे. त्यामुळे मुलीच्या बापाच्या अपेक्षा मुलगा सरकारी नोकरी अथवा खासगी नोकरीत उच्च पदावर हवा, अशीच दिसत आहे.
बॉक्स
या अपेक्षांची पडली भर
कोरोनानंतर प्रत्येकाचा खर्च वाढला असल्याने किमान महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावणाऱ्या तरुणाशी लग्न करीन, अशा मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा आहेत. यासोबत स्वतःची चारचाकी गाडी, शेती, सरकारी नोकरी हवी, अशा अपेक्षा आता कोरोनानंतर वाढल्या आहेत. माझी मुलगी लग्नानंतर नोकरी करणार, असेही मुलीचे वडील सांगू लागले आहेत.
बॉक्स
या अपेक्षा झाल्या कमी
कोरोनानंतर आता लग्नावर उधळपट्टी कमी करावी. मोठमोठ्या वस्तूंचे आहेर देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सर्व पाहुण्यांना लग्नाला आलेच पाहिजे ही अपेक्षाही आता कमी होत आहे. मोजक्याच उपस्थितांसमवेत लग्न उरकले जात आहेत. लग्न धूमधडाक्यातच झाले पाहिजे, अशी अपेक्षा आता कमी दिसून येते. याच पैशाची बचत भविष्यातील नियोजनासाठी वापर व्हावा, यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
बॉक्स
वधू-वर सूचक मंडळ म्हणतात
कोट
कोरोनापूर्वी लोकांच्या माफक अपेक्षा दिसून येत होत्या. मात्र आता प्रत्येकालाच सरकारी नोकरदार मुलगा, मुलगी पाहिजे आहे. मात्र सरकारी नोकरदारांची संख्या पाहता वधू-वर मंडळींनी अपेक्षा कमी केल्या पाहिजेत.
वधू-वर सूचक मंडळचालक
कोट
मी गेल्या अनेक वर्षांपासून वधू-वर सूचक मंडळ चालवत आहे. यापूर्वी लग्नावर होणारी उधळपट्टी आता कमी झाली आहे. मात्र असे असले तरी शेती, व्यावसायिक मुलापेक्षा सरकारी नोकरदार मुलांनाच अधिकजणांकडून पसंती दिली जाते.
वधू-वर सूचक मंडळचालक