कोरोनामुळे लग्नसमारंभातील बडेजावपणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:46+5:302021-06-01T04:26:46+5:30
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची ...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची उपस्थिती आणि २ तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर-वधूंनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. मात्र, बहुतांश वर-वधू आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे आता आपले मन मोडून लग्न उरकून घेत आहेत. लग्नसोहळ्यात बहुतांश आई-वडिलांकडून बडेजावपणाचे दर्शन घडते. समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्नसोहळ्यात पैशाची उधळपट्टी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ब्रेक लागला असून गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या मुला-मुलींचे लग्न अगदी साधेपणाने पार पडत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी कमी खर्चात लग्नसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोनामुळे किमान लग्नसोहळ्यातील गरीब-़श्रीमंतांमधील दरी तरी नाहीशी झाली असून कोरोनाने सध्या सर्वांना एकाच पंक्तीत आणून बसविले आहे.
बॉक्स
कमी खर्चातील बचतीची कोरोनाने दिली शिकवण
लग्नसोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ जोमाने राबविण्यात येत होती. मात्र, कोरोनाने या सर्वांना फाटा देऊन वैयक्तिक लग्नसोहळाही कमी खर्चात पार पाडता येतो, अशी शिकवण दिली आहे. अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले. लग्नसमारंभावरील या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, बँडपथक, कॅटरर्स, डेकोरेशन, सुगम संगीत पथक आदी अनेक व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.