धक्कादायक गावठी दारू स्थळ ठरत आहे कोरोना वाहक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:54+5:302021-04-20T04:36:54+5:30
तुमसर : लॉकडाऊनमध्ये देशी व विदेशी दारू विक्री केंद्र बंद आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. ...
तुमसर : लॉकडाऊनमध्ये देशी व विदेशी दारू विक्री केंद्र बंद आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. या दारू केंद्रावर कोरोनाबाधित गृह अलगीकरणात असलेले रुग्ण जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका वाढला आहे. देव्हाडीसह ग्रामीण परिसरात हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.
सध्या कोरोनाचा प्रसार हा गावखेड्यापर्यंत पोहोचला आहे. देशी-विदेशी दारू दुकाने बंद असल्याने तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण सध्या कोरोनाबाधित आहेत. गावठी दारूचे शौकीन गावठी दारू विक्री केंद्रावर सहज जातात. त्याठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील गृह अलगीकरणात असणाऱ्या रुग्णांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याकरिता सक्षम अशी यंत्रणा नाही. त्यामुळे हे रुग्ण गावभर फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
तळीरामांमुळे कुटुंबाला धोका
ग्रामीण भागातील गावठी दारू विक्री केंद्रावर तळीराम नियमित जातात. त्यामुळे तिथे त्यांचा संपर्क गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांशी येण्याची अधिक शक्यता आहे. हे तळीराम घरी गेल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात येतात. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.